जळगाव: पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर घरगुती गॅस सिलेंडची टंचाई भासू नये आणि काळाबाजार रोखला जावा, यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात विशेष ‘भरारी पथकाची’ स्थापना करण्यात आली आहे.

अवैध साठेबाजीवर राहणार करडी नजर
घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर, अवैध साठेबाजी आणि काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे. या पथकाद्वारे जिल्हयातील गॅस एजन्सीज आणि संशयास्पद ठिकाणांची तपासणी केली जाणार आहे.

पथकात कोणाकोणाचा समावेश?
प्रशासनाने स्थापन केलेल्या या भरारी पथकात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये:
- महसूल विभाग: संबंधित तालुक्याचे तहसीलदार.
- पोलीस विभाग: पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक.
- गॅस कंपन्या: BPCL, HPCL आणि IOCL चे सेल्स अधिकारी.
- पुरवठा विभाग: निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक.

नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन
गॅस पुरवठ्याबाबत किंवा काळाबाजाराबाबत नागरिकांकडे काही माहिती अथवा तक्रार असल्यास त्यांनी थेट जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- संपर्क क्रमांक: 0257-2223180
- ई-मेल आयडी: dsojalgaon1@gmail.com
घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि सर्वसामान्यांना वेळेवर सिलेंड मिळावे, यासाठी हे पथक आता संपूर्ण जिल्ह्यात सक्रिय झाले आहे.