जळगावच्या बाजारपेठेत फटाके विक्रीचा धक्कादायक प्रकार! हार्डवेअरच्या बोर्डाआड बेकायदा धंदा?

जळगावच्या बाजारपेठेत उपमहापौरांची फटाक्यांच्या दुकानांवर धडक! विनापरवाना विक्रीचा पर्दाफाश; सुरक्षेचा बोजवारा उघड

 

जळगाव : शहरातील दाट लोकवस्ती आणि वर्दळीच्या बाजारपेठेत फटाक्यांच्या दुकानांमध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या उपमहापौरांनी २ नोव्हेंबर रोजी अचानक फटाक्यांच्या दुकानांची पाहणी करत धडक कारवाई केली. या तपासणीत अनेक दुकानांकडे आवश्यक परवाने नसल्याचे, तसेच अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचे उघड झाले.

काही वर्षांपूर्वी जळगाव शहरातील दाट लोकवस्तीच्या आणि वर्दळीच्या बाजारपेठेत फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी उपमहापौरांनी ही अचानक पाहणी केली.

 

दुकानांवर हार्डवेअरचे बोर्ड, आत मात्र फटाक्यांची विक्री!

पाहणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. काही दुकानदारांकडे फटाके विक्रीसाठी आवश्यक असलेले वैध परवाने नसल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, काही दुकानांच्या बाहेर हार्डवेअर किंवा अन्य वस्तूंचे फलक लावलेले असतानाही आतमध्ये फटाक्यांची विक्री सुरू असल्याचे उघड झाले. त्यामुळे बेकायदा विक्रीचा प्रकार समोर आला आहे.

 

अग्निसुरक्षेच्या नावाखाली केवळ दोन बकेट!

फटाक्यांसारख्या ज्वलनशील वस्तूंची विक्री करताना आवश्यक असलेल्या अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले. काही दुकानांसमोर केवळ दोन लहान पाण्याच्या बकेट आणि एक-दोन रेतीच्या बकेट ठेवण्यात आल्या होत्या. त्यातही काही अग्निशमन साधने कालबाह्य झालेली असल्याचे तपासणीत आढळले.

 

वर्दळीच्या बाजारपेठेत अशा प्रकारे सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याची नाराजी उपमहापौर आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

महापालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाची उपस्थिती

 

या धडक पाहणी मोहिमेत उपमहापौरांसोबत उपायुक्त पंकज गोसावी, अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर, अग्निशमन विभाग प्रमुख अश्वजीत घरडे, भरत बारी यांच्यासह अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

दरम्यान, विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्या आणि अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कायदेशीर तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता संबंधित दुकानदारांवर नेमकी काय कारवाई होते, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *