‘जलगाव रन्स फॉर फार्मर्स’ संकल्पनेतून एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन; नावनोंदणीला सुरुवात!
व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ; स्पर्धेतून मिळणारा निधी मुख्यमंत्री दुष्काळ निवारण सहायता निधीस देणार
जळगाव : श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संस्थेतर्फे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, २० डिसेंबर २०२६ रोजी जळगाव शहरात ‘एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाची स्पर्धा ‘जलगाव रन्स फॉर फार्मर्स’ या संकल्पनेवर आधारित असून ती शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी समर्पित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रावसाहेब शेखावत यांनी सर्वप्रथम ५ किलोमीटर गटात आपली नावनोंदणी केली. महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असल्याने यंदाची मॅरेथॉन शेतकऱ्यांना समर्पित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेतून प्राप्त होणारा निधी मुख्यमंत्री दुष्काळ निवारण सहायता निधीस मदत म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी स्पर्धेचे समन्वयक डॉ. एम. व्ही. रावलानी, डॉ. प्रदीप एम. सोलंकी, रेस डायरेक्टर प्रा. प्रवीण पाटील आणि डॉ. दिनेश पुरी उपस्थित होते.
चार गटांत रंगणार मॅरेथॉन
ही स्पर्धा जळगाव शहरातील खानदेश सेंट्रल मॉलच्या मैदानावरून आयोजित करण्यात येणार असून धावण्याचा मार्ग शहरातील विविध रस्त्यांवरून असेल. स्पर्धेत २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा चार श्रेणी असतील. २१ आणि १० किलोमीटरच्या स्पर्धा आरएफआयडी प्रणालीद्वारे वेळेची नोंद ठेवून आयोजित केल्या जाणार आहेत.
नोंदणी शुल्क असे राहणार
– ३ किलोमीटर – ३५० रुपये
– ५ किलोमीटर – ५०० रुपये
– १० किलोमीटर – ७०० रुपये
– २१ किलोमीटर – ९०० रुपये
एसएसबीटी संस्थेच्या विद्यार्थ्यांना नोंदणी शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे
२१ आणि १० किलोमीटर या दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ५०० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. यासोबतच मानपत्र आणि बोधचिन्ह देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला आयोजकांतर्फे रनिंग टी-शर्ट, स्पर्धा पूर्ण केल्यानंतर पदक, प्रमाणपत्र आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच धावण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, बिस्किटे, चॉकलेट, निमगोळी, एनर्जल, लिंबूपाणी, हायड्रेशन सपोर्ट आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ऑनलाईन आणि ऑफलाईन नावनोंदणीची सुविधा
स्पर्धेसाठी इच्छुकांना www.konfhub.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नावनोंदणी करता येणार आहे. तसेच ऑफलाईन अर्ज महाविद्यालयातील विविध विभागांसह गोधडीवाला बुक डेपो (सिंधी कॉलनी), रमेश गारमेंट्स (सेंट्रल फुले मार्केट) आणि योगद्वार (सिंधी कॉलनी), जळगाव येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यावेळी डॉ. एस. बी. पवार, डॉ. अमोल लांडगे, डॉ. किरण पाटील, डॉ. पंकज पुनासे, एस. आर. गिरासे, जयदेवसिंग रावल, भागवत पाटील, वीरेंद्र मोरे, जे. बी. शिसोदिया, जितेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच आरोग्य, व्यायाम आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ही मॅरेथॉन जळगावकरांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे.
