जळगाव: जळगाव शहरात गेल्या चार दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसाय मोठ्या संकटात सापडला असून, पुढील दोन दिवसांत पुरवठा सुरळीत न झाल्यास अनेक हॉटेल्सना कुलूप लावण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुरवठा साखळी विस्कळीत; व्यावसायिकांची चिंता वाढली
शहरातील खाद्य व्यवसाय प्रामुख्याने १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरवर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सिलिंडरचा साठा उपलब्ध नसल्याने व्यावसायिकांची धावपळ होत आहे. अनेक मोठ्या हॉटेल्सकडे अवघ्या एक ते दोन दिवसांचा साठा शिल्लक आहे. काही ठिकाणी लाकूड किंवा डिझेल भट्टीचा पर्याय शोधला जात असला, तरी दाट लोकवस्ती किंवा बंदिस्त जागेत असलेल्या हॉटेलमध्ये धुरामुळे असे पर्याय वापरणे अशक्य असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

गॅस एजन्सींची ‘नकारघंटा’
मुख्य प्लांटमधूनच गॅसचा पुरवठा होत नसल्याने स्थानिक गॅस एजन्सी चालकही हतबल झाले आहेत. “डिलिव्हरीसाठी सिलिंडरच उपलब्ध नाहीत, त्यामुळे ग्राहकांना काय उत्तर द्यायचे हा मोठा प्रश्न आहे,” अशी हतबलता डिलिव्हरी बॉय तुळशीदास पाटील यांनी व्यक्त केली.

गॅस एजन्सीचे व्यवस्थापक अजय ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहराची महिन्याची गरज साधारणतः साडेतीन हजार व्यावसायिक सिलिंडरची आहे. पुरवठा खंडित झाल्यामुळे या साखळीवर मोठा परिणाम झाला आहे.

अनेकांचा रोजगार धोक्यात
या टंचाईचा फटका केवळ हॉटेल मालकांनाच नाही, तर तिथे काम करणारे कर्मचारी, रोजंदारीवरील मजूर आणि हॉटेल व्यवसायावर अवलंबून असलेले भाजीपाला व दूध विक्रेते यांनाही बसणार आहे. तसेच, बाहेरून शिक्षणासाठी किंवा कामासाठी आलेल्या ग्राहकांच्या खानावळीच्या सुविधेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन व्यावसायिक गॅसचा पुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी जळगाव शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे.