१५ हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील भुकरमापक एसीबीच्या जाळ्यात; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाख
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील भुकरमापक जितेंद्र प्रकाश पाटील यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या जळगाव शहरातील वडिलोपार्जित मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार होऊन त्यांच्या वडिलांचे नाव चुकीने कमी करण्यात आले होते. या चुकीच्या नोंदीविरोधात तक्रारदारांनी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयाकडे अपील दाखल केले होते. अपील मंजूर झाल्यानंतर संबंधित चुकीची नोंद रद्द करून तक्रारदारांच्या वडिलांचे नाव पुन्हा सातबारा उताऱ्यावर नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदारांनी संबंधित कार्यालयात अर्ज दाखल केला. मात्र, आदेश मिळूनही अनेक दिवस कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी पुन्हा कार्यालयात जाऊन कामाच्या प्रगतीची विचारणा केली.
यावेळी भुकरमापक जितेंद्र प्रकाश पाटील यांनी संबंधित काम तातडीने पूर्ण करून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली १० हजार रुपये आणि स्वतःसाठी ५ हजार रुपये, अशी एकूण १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाचेची मागणी होताच तक्रारदारांनी २५ जून २०२६ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे तक्रारदार आरोपीकडे गेले असता, जितेंद्र प्रकाश पाटील यांनी १५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक पंचनामा करून आरोपीविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, तसेच कर्मचारी संगीता पवार, राकेश दुसाने, प्रदीप पोळ आणि मनोज पाटील यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे. :::
