जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील पटेल नगर परिसरातील चर्चमागील प्लॉट क्रमांक ५ वर मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्लॉट राजकुमार ज्योतीराम चंडीरामाने यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले जात असून, या ठिकाणी साठवण्यात आलेली वाळू विक्रीसाठी वापरली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणाबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाचा या प्रकाराकडे ‘कानाडोळा’ होत आहे का, असा प्रश्न आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाहतूक, धूळ आणि आवाजामुळे नागरिक त्रस्त
रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मोठ्या वाहनांची सततची ये-जा, मशीनमधून होणारा कर्णकर्कश आवाज आणि उडणारी धूळ यामुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
तक्रारींना प्रतिसाद नाही; अधिकाऱ्यांकडून फोनही उचलला जात नसल्याचा आरोप
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या प्रकाराबाबत महसूल विभागासह संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही नागरिकांनी संबंधित अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला जात नसल्याची तक्रारही केली आहे.
“वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नाही. अधिकारी फोन घेत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
धाडस महाराष्ट्र न्यूजची प्रत्यक्ष पाहणी
या संदर्भात परिसरातील रहिवासी अमोल पाटील यांनी धाडस महाराष्ट्र न्यूजकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर संपादक विकास पाथरे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा, सुरू असलेली यंत्रसामग्री आणि परिसरातील परिस्थितीचे व्हिडिओ फुटेज संकलित करण्यात आले.
ई-टीपीबाबतही संशय
स्थानिक नागरिकांनी केलेल्या आरोपानुसार, वाळू वाहतूक करणाऱ्या काही वाहनांकडे आवश्यक ई-टीपी (e-TP) नसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जर हे आरोप सत्य असतील तर हा प्रकार गंभीर असून महसूल विभागाने याची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
‘प्रशासन झोपले आहे का?’
वारंवार तक्रारी, स्थानिकांचा वाढता संताप आणि प्रत्यक्ष परिस्थिती समोर येत असतानाही कारवाई होत नसल्याने “प्रशासन झोपले आहे का?” असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी पटेल नगरातील नागरिकांनी केली आहे.
