जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळेंच्या पाठपुराव्याला यश!

जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळेंच्या पाठपुराव्याला यश!

जळगाव : जळगाव शहरातील मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने महानगरपालिकेला १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, यासंदर्भातील शासन निर्णय ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.

शहराच्या विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, जळगाव शहरासाठी १० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

१९ प्रभागांमध्ये होणार विकासकामे

मंजूर निधीतून जळगाव शहरातील १९ प्रभागांमध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. याशिवाय शहराच्या प्रमुख प्रवेशमार्गांवर प्रकाशव्यवस्था उभारण्यासाठीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यासोबतच प्रमुख रस्त्यांवरील सुरक्षिततेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

प्रलंबित रस्त्यांच्या कामांसाठीही प्रयत्न.

जळगाव शहराचा सर्वांगीण आणि समतोल विकास हे आपले प्राधान्य असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. शहरातील विविध भागांतील उर्वरित विकासकामांसाठीही शासनाकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत. तसेच प्रलंबित रस्त्यांची कामे लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे मानले आभार

जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय सावकारे यांचे आभार मानले.

शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, दर्जेदार रस्ते, मूलभूत नागरी सुविधा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच आपले ध्येय असल्याचे सांगत, जळगावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा विश्वास आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *