जळगावात कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; संशयित आरोपी अटकेत!

जळगावात कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; संशयित आरोपी अटकेत

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सनी विनोद डोळे (वय २१, रा. शिवाजीनगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याची आजी सुमनबाई तायडे जखमी झाल्या आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी सुरज नारायण वानखेडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसक घटनेत

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सनी डोळे आणि त्याच्या बहिणीचा पती सुरज नारायण वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादातून संशयित आरोपीने सनीवर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात सनी गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर सनीला तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

आई आणि आजीचा आक्रोश

या घटनेत सनीची आजी सुमनबाई तायडे यांच्या हातालाही दुखापत झाली. नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची आई आणि आजी यांनी रुग्णालयात केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. अवघ्या २१व्या वर्षी सनीचा मृत्यू झाल्याने शिवाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपी सुरज नारायण वानखेडे याला अटक केली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

कौटुंबिक वादातून घडलेल्या या गंभीर घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *