यावलमध्ये संशयाचे थरारक हत्याकांड! २० वर्षीय पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप; पती साकळीत जेरबंद

यावलमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या? पतीला साकळी परिसरातून अटक

तिरुपती नगरातील धक्कादायक घटना; २० वर्षीय विवाहितेचा गळा आवळून खून केल्याचा आरोप, पोलिसांचा तपास सुरू

यावल : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याच्या कारणावरून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना यावल शहरातील तिरुपती नगर परिसरात सोमवारी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मशीराबी फरदीन खान (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव असून, तिचा पती फरदीन खान आरिफ खान (वय २१) याला पोलिसांनी साकळी परिसरातून ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फरदीन खान आणि मशीराबी हे यावल शहरातील तिरुपती नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. सोमवारी घरातील इतर सदस्य लग्नसमारंभासाठी बाहेर गेले असताना पती-पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. दरम्यान, घटनेनंतर घटनास्थळावरून निघून गेलेल्या संशयित पतीचा शोध घेत पोलिसांनी त्याला साकळी गावाजवळून ताब्यात घेतले.

प्राथमिक चर्चेनुसार, पत्नीच्या चारित्र्यावर संशय हे हत्येमागील कारण असल्याचे सांगितले जात असले, तरी या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासानंतरच हत्येचे नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील समोर येणार आहे.

धाडस महाराष्ट्र न्यूज — आवाज जनतेचा, बातमी धाडसाची!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *