जळगाव : अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केल्यानंतर त्यांच्या जळगाव येथील राहत्या घरावर पुढील तपासासाठी सील करण्यात आले होते. मात्र या सीलबंद घरात घुसून पुरावे नष्ट करण्याचा किंवा मौल्यवान वस्तू हलविण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 207/2026 अन्वये भा.न्या.सं. कलम 305(अ), 331(2), 238 व 62 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता वसंत नवघरे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला ACB ने किरण चौधरी यांच्याविरुद्ध कारवाई केल्यानंतर त्यांच्या जळगाव शहरातील गणेश कॉलनी येथील साईप्रभा आर्केडमधील घराला अधिकृतपणे सील करण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी रात्री शेजाऱ्यांनी सीलबंद घरातून संशयास्पद आवाज येत असल्याची माहिती ACB अधिकाऱ्यांना दिली.
त्यानंतर पोलीस व ACB पथक घटनास्थळी पोहोचले असता घराच्या मागील बाजूस शिडी लावून दोन व्यक्तींनी घरात प्रवेश केल्याचे आढळून आले. पथकाने तत्काळ कारवाई करत दोघांना जागीच ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रसाद वसंत नारखेडे (वय 33, रा. डांभुर्णी, ता. यावल) आणि प्रविण अशोक महाजन (वय 36, रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांचा समावेश आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी सीलबंद घराचे कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तू अथवा संभाव्य पुरावे हटविण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ही घुसखोरी करण्यात आली होती का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित लोकसेवकानेच हा प्रयत्न करवून घेतला होता का? ACB च्या तपासाआधी घरातील रोख रक्कम किंवा अन्य मौल्यवान वस्तू बाहेर काढण्याचा डाव होता का? तसेच अटक आरोपींचे संबंधित अधिकाऱ्याशी किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी नेमके काय संबंध आहेत? या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असून पुढील चौकशीत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे जळगावात मोठी खळबळ उडाली असून ACB आणि पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
