- जळगावात १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान ‘स्पिक मॅके ऑटम कन्व्हेन्शन २०२६’; ४०० विद्यार्थ्यांसह देशभरातील नामवंत कलाकारांची उपस्थिती
जळगाव : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पिक मॅके यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात १ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान चार दिवसीय ‘Spic Macay Autumn Convention 2026’ या सांस्कृतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. खान्देशात स्पिक मॅकेसोबत अशा राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन करण्याचा मान प्रथमच कान्ह ललित कला केंद्राला मिळाला आहे.
या चार दिवसीय सांस्कृतिक संमेलनात १३ ते २७ वयोगटातील सुमारे ४०० विद्यार्थी सहभागी होणार असून, सकाळच्या सत्रात विविध कलाप्रकारांच्या कार्यशाळा, तर सायंकाळी नामवंत कलाकारांची सांस्कृतिक सादरीकरणे होणार आहेत. हे कार्यक्रम कान्ह ललित कला केंद्राच्या नव्याने सुरू झालेल्या महाकवी कालिदास सभागृहात आयोजित करण्यात येणार आहेत.
पद्मश्री शाहिद परवेज यांच्या सितार वादनाने उद्घाटन
संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री सितारवादक उस्ताद शाहिद परवेज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, स्वागताध्यक्ष भालचंद्र पाटील, स्पिक मॅकेच्या समन्वयक सिम्पी सिंग तसेच कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सत्रात कान्ह ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचे सप्तकला सादरीकरण झाल्यानंतर उस्ताद शाहिद परवेज यांचे सितार वादन होणार आहे.
योग, चित्रपट आणि शास्त्रीय संगीताची मेजवानी
२ ऑक्टोबरला पहाटे योगगुरू स्वामी त्यागराजनंदन विद्यार्थ्यांना हटयोग व ध्यानसाधनेचे मार्गदर्शन करणार आहेत. गांधी जयंतीनिमित्त ‘द मेकिंग ऑफ महात्मा’ या चित्रपटाचे सादरीकरण आणि चित्रपट निर्मितीच्या प्रवासाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी जैन उद्योग समूहाचे कार्यकारी अध्यक्ष अशोकजी जैन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
सायंकाळच्या सत्रात संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांचे गायन, तर संगीत नाटक अकादमी युवा पुरस्कारप्राप्त विदुषी कपिला वेणू यांचे कुडियट्टम नृत्य सादरीकरण होणार आहे.
विविध वाद्यांचे सादरीकरण
३ ऑक्टोबरला ऑल इंडिया रेडिओ युवा पुरस्कारप्राप्त कलाकार भीमण्णा जाधव पारंपरिक सुंद्री वाद्याचे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर पद्मश्री पुरस्कारप्राप्त कालुराम बामणिया यांचे नग-नगाडी आणि ढोलकच्या साथीने कबीर गायन होणार आहे.
सायंकाळी लालगुडी विजयालक्ष्मी यांचे व्हायोलिन वादन, तसेच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद राजा मियाँ यांचे सादरीकरण होणार आहे.
नामवंत कलाकारांकडून कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन
परिषदेच्या कार्यशाळांमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कथक नर्तिका प्रेरणा श्रीमली, प्रसिद्ध तबलावादक उमेश बॅनर्जी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रकार संजय चित्रे तसेच मध्य प्रदेशातील नक्षीया शामा विद्यार्थ्यांना विविध कलाप्रकारांचे मार्गदर्शन करणार आहेत.
याशिवाय देशाच्या विविध भागांतून आलेले हार्मोनियम, घट्टम, तबला, व्हायोलिन, मृदंग, ढोलक, नग-नगाडी आणि इतर वाद्यांचे नामवंत कलाकारही या संमेलनात सहभागी होणार आहेत.
विविध राज्यांतील विद्यार्थी जळगावात
महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर, पुणे, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, बुलढाणा यांसह गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी या संमेलनात सहभागी होणार आहेत.
कार्यशाळांसाठी विविध दालनांना पंडित बिरजू महाराज, पंडित पलुस्कर-पंडित भातखंडे, पंडित झाकीर हुसेन तसेच जळगावचे प्रसिद्ध चित्रकार के.के. मूस प्रेरणा कलादालन अशी नावे देण्यात आली आहेत.
चार दिवसीय संमेलनाची सांगता ४ ऑक्टोबरला योगगुरू स्वामी त्यागराजनंदन यांच्या उपस्थितीत होणार आहे. संपूर्ण आयोजनासाठी केसीई सोसायटीच्या पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सुमारे १०० जणांचे पथक कार्यरत आहे.
