जळगावात ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार; खानदेशात पहिल्यांदाच आधुनिक न्यूरो-इंटरव्हेन्शनल शस्त्रक्रिया

अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये डॉ. निलेश किनगे यांच्या टीमची कामगिरी; ओपन ब्रेन सर्जरीशिवाय रुग्णाला नवजीवन

जळगाव (प्रतिनिधी): जळगावातील अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटल अँड अॅडव्हान्स्ड स्ट्रोक सेंटर येथे वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूतील ब्रेन अँन्युरिझम या जीवघेण्या आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले. खानदेशात प्रथमच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. निलेश किनगे व त्यांच्या टीमने ही यशस्वी न्यूरो-इंटरव्हेन्शनल शस्त्रक्रिया पार पाडली.

रुग्णाला तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एमआरआय आणि डीएसए तपासणीत मेंदूतील मुख्य रक्तवाहिनीत मोठा फुगा (अँन्युरिझम) असल्याचे निदान झाले. हा फुगा फुटल्यास मेंदूत गंभीर रक्तस्राव, अर्धांगवायू किंवा जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. निलेश किनगे यांनी कोणतीही ओपन ब्रेन सर्जरी न करता, मांडीच्या धमनीमार्गे मेंदूपर्यंत पोहोचत ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर स्टेंट’ यशस्वीपणे बसवला. या अत्याधुनिक स्टेंटमुळे रक्ताचा प्रवाह थेट मुख्य रक्तवाहिनीत सुरू राहिला आणि अँन्युरिझममध्ये रक्त जाणे थांबल्याने फुगा फुटण्याचा धोका टळला.

उपचारानंतर रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान भूलतज्ज्ञ डॉ. विनोद किनगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी डॉ. निलेश किनगे म्हणाले की, “खानदेशातच आंतरराष्ट्रीय दर्जाची न्यूरो-इंटरव्हेन्शनल सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता अशा गंभीर आजारांच्या उपचारांसाठी रुग्णांना मुंबई, पुणे किंवा नागपूरसारख्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही.”

यशस्वी उपचारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. किनगे आणि अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *