शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटात; हेक्टरी १ लाख मदत आणि सरसकट कर्जमाफी द्या – हर्षवर्धन सपकाळ

शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटात; हेक्टरी १ लाख मदत आणि सरसकट कर्जमाफी द्या – हर्षवर्धन सपका

बुलढाणा, २० सप्टेंबर २०२६ : मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. सरकार बैठका आणि चर्चांमध्ये वेळ घालवत आहे. संकटातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत, सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी केली.


बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने पावसाअभावी उद्ध्वस्त झालेल्या २० एकर सोयाबीनचे पीक मोडीत काढण्याचा निर्णय घेतल्याचे सपकाळ यांनी सांगितले. या शेतकऱ्याने मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आपल्या शेताची पाहणी करावी, अशी विनंती केली होती. मात्र, कोणीही त्याच्याकडे फिरकले नाही, असा आरोप त्यांनी केला. कृषीमंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाही या शेतकऱ्याची भेट घेतली नसल्याचे सपकाळ म्हणाले.
“दुष्काळ हा राजकारण करण्याचा विषय नाही. संकटातील बळीराजाला मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये,” असे आवाहन सपकाळ यांनी केले.

शक्तीपीठ महामार्गाच्या निधीवरून सरकारला सवाल
शेतकऱ्यांसाठी पैसे नसल्याची सबब सरकारने देऊ नये, असे सांगत सपकाळ यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी प्रस्तावित ७८ हजार कोटी रुपयांच्या निधीचा मुद्दा उपस्थित केला. गरज नसलेल्या या प्रकल्पाचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळाच्या प्रश्नावर आयोजित बैठकीत सत्ताधारी पक्षाचे खासदार काजू-बदाम खात असल्याचा आरोप करत सपकाळ यांनी सरकारच्या संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कृषीमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसचा निषेध
दरम्यान, कृषीमंत्र्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील दौऱ्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केल्याचे सपकाळ यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याऐवजी केवळ दौरे आणि भेटींचा देखावा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.


महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात कर्जमाफीच्या पहिल्या यादीत दोन शेतकऱ्यांची नावे होती, तर दुसऱ्या यादीत एका शेतकऱ्याचे नाव आले. संबंधित शेतकऱ्याला केवळ ४० हजार रुपयांची कर्जमाफी मिळाल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे सरकारचे दावे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात मोठी तफावत असल्याचे सपकाळ म्हणाले.

शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास काँग्रेसकडून सुरू असलेले सत्याग्रह आणि गावोगावी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मंत्री तसेच सत्ताधारी पक्षाचे आमदार-खासदार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा सपकाळ यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *