जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने रामेश्वर कॉलनीतील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिसरातील प्रलंबित समस्यांचा तातडीने निपटारा न झाल्यास येत्या २३ मार्च २०२६ रोजी जिवंतपणी तिरडीवर झोपून अंत्ययात्रा काढण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी आमदार सुरेश दामू भोळे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

या संदर्भात नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आमदारांनी रामेश्वर कॉलनीला भेट देऊन येथील समस्या कायमच्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणूक होऊन गेल्यानंतरही अनेक मूलभूत प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ आहेत.

नागरिकांनी मांडल्या या पाच प्रमुख समस्या:
१. रस्त्याचा प्रश्न: एमआयडीसी भूखंड क्र. डी ४५/२ येथून कामगारांना जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देणे.
२. स्मशानभूमी: मेहरूण परिसरातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे.
३. हनुमान मंदिर परिसर: गट नंबर २५० मधील हनुमान मंदिराजवळील खुल्या जागेचे (Open Space) सुशोभीकरण करणे.
४. स्मारक व निधी: छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा राखीव करणे आणि त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देणे.
५. संरक्षण भिंत: गट नं. २४९, एमडीएस कॉलनीतील शिवदत्त मंदिराजवळील खुल्या जागेला संरक्षण भिंत बांधणे.

२३ मार्चचा दिला अल्टिमेटम
निवेदनात नागरिकांनी आपली व्यथा मांडताना आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आम्ही आपल्या आश्वासनांवर विश्वास ठेवला होता, मात्र आता संयम सुटत चालला आहे,” असे रहिवाशांनी म्हटले आहे. जर २३ मार्च २०२६ पर्यंत या मागण्यांबाबत ठोस कार्यवाही झाली नाही, तर जळगाव शहरात ‘जिवंतपणी तिरडीवर झोपून अंत्ययात्रा’ काढून अनोखे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर ज्ञानेश्वर आर. पाटील, संदीप प्रकाश मांडोळे, विशाल गोपाळ पाटील, महेश वासुदेव माळी, सचिन वाघ, भाऊसाहेब पाटील, उमेश खांबेटे, एस. आर. जगताप, संजय सपकाळे, हर्षल वाणी आणि नंदू पुरोहित यांच्यासह परिसरातील त्रस्त उपस्थित होते.