क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये गोंधळ? उपमहापौर मनोज चौधरींचा प्रशासनाला 10 मुद्द्यांवर जाब

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील घरगुती कचरा संकलनासाठी राबविण्यात येत असलेल्या आयसीटी आधारित क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंमलबजावणीतील त्रुटी, नियमितता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांनी आज विशेष बैठक घेतली.

या बैठकीला उपायुक्त गायकवाड मॅडम, सहाय्यक आयुक्त समीर बोरवले तसेच आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. बैठकीदरम्यान क्यूआर कोड प्रणालीच्या कार्यक्षमतेबाबत अनेक गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

उपमहापौर चौधरी यांनी प्रशासनाकडे शहरातील एकूण घरांपैकी किती घरांवर क्यूआर कोड बसविण्यात आले आहेत व किती घरे अद्याप वंचित आहेत याची प्रभागनिहाय माहिती मागवली. तसेच मागील १२ महिन्यांतील क्यूआर कोड स्कॅनिंगचा संपूर्ण डेटा सादर करण्याचे निर्देश दिले.

याशिवाय खराब, नष्ट किंवा स्कॅनिंग न होणाऱ्या क्यूआर कोडची संख्या, त्यांची पुनर्स्थापना, नियमित स्कॅनिंग न होणाऱ्या घरांची माहिती आणि त्यामागील कारणे याबाबतही खुलासा मागविण्यात आला.

क्यूआर कोड स्कॅनिंग प्रणाली बंद असल्यास किंवा मोबाईल कार्यरत नसल्यास कचरा संकलनाची नोंद कोणत्या पद्धतीने घेतली जाते, याबाबतही प्रशासनाला उत्तर देण्यास सांगण्यात आले. तसेच दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक आढाव्याची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे आणि त्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, याची माहिती मागवण्यात आली.

कचरा संकलन वाहनांवरील जीपीएस आणि स्कॅनर प्रणाली प्रत्यक्षात कार्यरत आहेत की नाही, याची पडताळणी कोणत्या अधिकाऱ्यांनी आणि किती वेळा केली याचाही तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. जीपीएस लोकेशन आणि क्यूआर कोड स्कॅनिंगमध्ये तफावत आढळली असल्यास त्यासंदर्भातील सर्व प्रकरणांचा अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय संपूर्ण प्रणालीचे कोणतेही थर्ड पार्टी ऑडिट करण्यात आले आहे का, याबाबतचा अहवालही मागवण्यात आला. प्रत्येक घरातील कचरा डस्टबिनवर टॅग लावणे अनिवार्य असताना अनेक ठिकाणी टॅग नसल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तातडीने खुलासा सादर करण्याच्या सूचना उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिल्या.

शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने सर्व माहिती लवकरात लवकर सादर करावी, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *