मेहरूण तलावातील सांडपाण्याची समस्या तातडीने सोडवा; उपमहापौर व सभापतींचे प्रशासनाला कडक निर्देश

मेहरूण तलावातील सांडपाण्याची समस्या तातडीने सोडवा; उपमहापौर व सभापतींचे प्रशासनाला कडक निर्देश 

जळगाव | धाडस महाराष्ट्र न्यूज

जळगाव शहराची शान आणि वैभव मानल्या जाणाऱ्या मेहरूण तलावात वारंवार सांडपाणी मिसळत असल्याच्या गंभीर तक्रारींची दखल घेत उपमहापौर मनोज चौधरी, सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेवक नितीन सपके, प्रफुल्ल देवकर, नगरसेविका वैशाली पाटील आणि सुरेखा तायडे यांनी संयुक्तपणे मेहरूण तलावाची पाहणी केली.

मेहरूण तलावातील वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणप्रेमी, हिंदू सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे आगामी गणेशोत्सव आणि दुर्गोत्सवाच्या काळात जळगाव शहरातील हजारो गणेश व देवीच्या मूर्तींचे विसर्जन मेहरूण तलावात केले जाते. त्यामुळे उत्सवापूर्वी तलावात सांडपाणी येणे पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली.

पाहणीदरम्यान उपमहापौर मनोज चौधरी आणि सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी शहर अभियंता योगेश बोरोले व प्रभाग अभियंता आर. डी. पाटील यांना तात्काळ आवश्यक कामे हाती घेण्याचे कडक निर्देश दिले. सांडपाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी आणि तलावाचे प्रदूषण थांबवण्यासाठी विलंब न करता कार्यवाही करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

यावेळी प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर आगामी महासभेत हा विषय लावून धरून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, असा इशारा प्रभागातील नगरसेवकांनी दिला.

जळगावच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मेहरूण तलावाचे संवर्धन आणि स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *