ITI मध्ये ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्यास विरोध; जळगाव जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव | प्रतिनिधी

राज्य सरकारच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे मोटार वाहन प्रशिक्षण शाळा सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात जळगाव जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनने बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर केले.

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने २४ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार राज्यातील शासकीय ITI मध्ये मोटार वाहन प्रशिक्षण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो मान्यताप्राप्त मोटार ड्रायव्हिंग स्कूल, त्यांचे संचालक, प्रशिक्षक, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होण्याची भीती असोसिएशनने व्यक्त केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाचा कौशल्य विकासाचा उद्देश स्वागतार्ह असला तरी अनेक दशकांपासून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सुरक्षित व जबाबदार वाहनचालक घडविण्याचे कार्य खासगी मोटार ड्रायव्हिंग स्कूल करत आहेत. त्यामुळे या व्यवसायाच्या अस्तित्वावर परिणाम करणारा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित संघटनांशी सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे.

असोसिएशनने शासन नियामक असताना त्याच क्षेत्रात सेवा पुरवठादार म्हणून उतरल्यास समान स्पर्धेच्या तत्त्वाला बाधा पोहोचेल, असा मुद्दा मांडला. तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम १४ आणि कलम १९(१)(ग) अंतर्गत व्यवसाय करण्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणीही करण्यात आली.

असोसिएशनच्या प्रमुख मागण्या :

२४ जुलै २०२६ च्या निर्णयाच्या अंमलबजावणीस तात्काळ स्थगिती द्यावी.

राज्यातील सर्व मान्यताप्राप्त मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा.

या निर्णयाचा रोजगार व व्यवसायावर होणाऱ्या परिणामांचा स्वतंत्र अभ्यास करावा.

विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रशिक्षण देण्यासाठी विद्यमान परवानाधारक मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा उपयोग करावा.

जिल्हाधिकारी कार्यालयाने हे निवेदन सकारात्मक शिफारशीसह संबंधित विभागाकडे तातडीने पाठवावे.

यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा लढा केवळ एका व्यवसायाचा नसून हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा, रस्ता सुरक्षेचा आणि अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या अस्तित्वाचा आहे. शासनाने तातडीने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अन्यथा राज्यभर लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी जळगाव जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपाध्यक्ष जब्बार शेख, सचिव अडकमोल तसेच सदस्य रईस मिर्झा आणि इकबाल मिर्झा उपस्थित होते.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *