तासखेड्यात केळी पिकाची १,००० ते १,२०० झाडांची नासधूस; अज्ञात इसमाविरोधात एनसीआर दाख
धाडस महाराष्ट्र न्यूज | रावेर (प्रतिनिधी)
रावेर तालुक्यातील तासखेडा येथील शेतकरी जिजाबराव शामराव चौधरी (वय ६५) यांच्या केळीच्या बागेत अज्ञात इसमाने घुसून सुमारे १,००० ते १,२०० केळीच्या झाडांची नासधूस केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी एनसीआर दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने जिजाबराव चौधरी यांच्या शेतात प्रवेश करून केळीच्या झाडांची तोडफोड केली. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर झाडांची नासधूस झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वर्षभर मेहनत घेऊन जोपासलेले केळीचे पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहून त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत अज्ञात इसमाविरोधात एनसीआर (Non-Cognizable Report) क्रमांक ०३३८/२०२६ दाखल केला आहे. या घटनेची नोंद १८ जून २०२६ रोजी करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे.
घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट करून उभे केलेल्या पिकाची अशा पद्धतीने नासधूस करणाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी जिजाबराव शामराव चौधरी यांनी केली आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, शेतीमाल व पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही परिसरातून होत आहे.
