असोदा उड्डाणपूल प्रकरणात गडकरींचा निर्णायक निर्णय; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट– खा. स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश; जळगावातील चार महत्त्वाच्या चौकांतील उड्डाणपूल व VUP प्रस्तावांनाही सकारात्मक प्रतिसाद
जळगाव | प्रतिनिधी : धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या गंभीर घटनेची केंद्रीय स्तरावर दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याबरोबरच जबाबदार अधिकारी आणि संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती खासदार स्मिता उदय वाघ यांनी दिली.
उड्डाणपूल खचल्याची घटना घडल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत नागरिकांशी संवाद साधला आणि त्यानंतर नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
या दुर्घटनेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जळगावच्या महापौर दीपमाला काळे तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.
दरम्यान, खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दाही केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर मांडला. आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौक तसेच नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर मार्गावर उड्डाणपूल अथवा व्हेईक्युलर अंडरपास (VUP) उभारण्याची मागणी त्यांनी केली. या प्रस्तावांनाही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यामुळे जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, अपघातांना आळा बसण्यास आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याबाबत खासदार स्मिता उदय वाघ म्हणाल्या, “जळगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू राहील.”
