चाळीसगावात पोलिसांचा धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन; 44 सराईत आरोपी ताब्यात, तलवारींसह शस्त्रसाठा जप्त

चाळीसगावात पोलिसांचा धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन; 44 सराईत आरोपी ताब्यात, तलवारींसह शस्त्रसाठा जप्

जळगाव, दि. 24 जून – चाळीसगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या विशेष मोहिमेत तब्बल 80 रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 44 आरोपी घरी आढळून आल्याने त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणून पडताळणी करण्यात आली. याशिवाय तलवारींसह धारदार शस्त्रांचा साठा जप्त करत अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 24 जून रोजी पहाटे 2 ते 4 वाजेदरम्यान हे विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांच्या पथकांनी एकाचवेळी धाडसत्र सुरू करून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली.

तलवारी आणि कोयत्यांसह दोघांवर गुन्हा

नवाब नगर, धुळे रोड परिसरात राहणाऱ्या दोन संशयितांकडे 18 तलवारी आणि 10 कोयत्यांसारखी धारदार शस्त्रे आढळून आली. ही शस्त्रे विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा संशय असून त्यांच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितावर प्रतिबंधात्मक कारवाई

नागद रोड परिसरातील एका व्यक्तीकडे संशयास्पद हालचाली आढळून आल्याने त्याच्यावर मुंबई पोलिस कायदा कलम 65 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

31 लाखांची वाहने जप्त

कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणांहून तीन चारचाकी वाहने ताब्यात घेतली. या वाहनांची एकूण किंमत सुमारे 31 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहनांबाबत आवश्यक कागदपत्रे व इतर बाबींची तपासणी सुरू असून संबंधितांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

वॉरंट आणि समन्सची बजावणी

या मोहिमेत न्यायालयाकडून प्राप्त 8 पकड वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच 32 समन्स बजावण्यात आले. अनेक फरार आणि न्यायालयीन प्रक्रियेला टाळाटाळ करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी थेट कारवाई केली.

हातभट्टी दारूविरोधात मोहीम

दारूबंदी मोहिमेअंतर्गत 3 गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी 60 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली तसेच सुमारे 2 हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करून अवैध दारू निर्मितीवर मोठा आघात केला.

60 पोलिसांचा सहभाग

ही संपूर्ण मोहीम पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेत उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी मिळून सुमारे 60 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कोम्बिंग ऑपरेशनची मालिका पुढेही सुरू राहणार आहे.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *