मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधासाठी जळगाव महानगरपालिकेची व्यापक मोहीम; शहरभर घरभेटी, धूर फवारणी आणि कंटेनर सर्वेक्षणाला वेग

मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधासाठी जळगाव महानगरपालिकेची व्यापक मोहीम; शहरभर घरभेटी, धूर फवारणी आणि कंटेनर सर्वेक्षणाला वे

जळगाव | दि. २८ जुलै २०२६

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया तसेच इतर डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये पंप फवारणी, धूर फवारणी (फॉगिंग), कंटेनर सर्वेक्षण, घरभेटी, डासांच्या अळ्यांचा शोध आणि नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

महानगरपालिकेने शहरातील सर्व १९ प्रभागांसाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार केला असून दोन टप्प्यांमध्ये पंप फवारणीचे काम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक १ ते ९ मधील फवारणी पूर्ण करण्यात आली असून प्रभाग क्रमांक १० मध्ये काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रभाग क्रमांक ११ ते १९ मधील पंप फवारणी पूर्ण झाली असून पुढील फेऱ्यांचे नियोजनही करण्यात आले आहे.

डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये धूर फवारणीची विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये राज मालती नगर, खडके चाळ, गेंडालाल मिल, लक्ष्मी नगर, शिवाजी नगर, घरकुल परिसर, कांचन नगर, प्रशांत चौक, रेल्वे लाईन परिसर, वाल्मीक नगर, जैनाबाद, तानाजी मालुसरे नगर, आसोदा रोड, गोपाळपुरा, इंदिरा नगर, गुरुनानक नगर, बालाजी पेठ, जोशी पेठ, मराठी पेठ, रामपेठ, भवानी पेठ, तांबापुरा, राम रहीम नगर, सम्राट कॉलनी, संजय गांधी नगर, मेहरूण गावठाण, सुप्रीम कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, उस्मानिया नगर यांसह शहरातील अनेक भागांचा समावेश आहे.

४७ हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण

महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी शहरभर व्यापक कंटेनर सर्वेक्षण मोहीम राबविली. दिनांक २४ जुलै २०२६ पर्यंत तब्बल ४७,७०६ घरांना भेटी देण्यात आल्या.

या सर्वेक्षणादरम्यान:

१,३६,९१४ पाण्याची भांडी व कंटेनर तपासण्यात आले.

१,३३० घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या.

१,७९९ कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या.

९९,००७ निरुपयोगी पाण्याची भांडी व कंटेनर रिकामे करण्यात आले.

२,३०८ पाणीसाठ्यांवर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या.

डासांची पैदास होऊ नये यासाठी नागरिकांना घरातील कुलर, पाण्याच्या टाक्या, टायर, फुलदाण्या, डबे तसेच इतर वस्तूंमध्ये पाणी साचू न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जनजागृतीवरही भर

मलेरिया आणि डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळणे, पाण्याची भांडी नियमित स्वच्छ ठेवणे, मच्छरदाणीचा वापर करणे तसेच ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.

आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, फवारणी पथके आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रत्येक प्रभागात घरभेटी, अळी शोध मोहीम, फवारणी आणि जनजागृतीचे काम नियमितपणे करण्यात येत आहे.

आयुक्त आदित्य जिवने यांचे नागरिकांना आवाहन

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. आदित्य जिवने यांनी नागरिकांना या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले, “मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधासाठी महानगरपालिकेमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या घरात, अंगणात, गच्चीवर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये. आरोग्य कर्मचारी घरभेटी व सर्वेक्षणासाठी येत असताना त्यांना सहकार्य करावे. ताप, अंगदुखी किंवा डेंग्यूसदृश लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.”

‘स्वच्छ परिसर – निरोगी जळगाव’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनासोबत नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *