जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला विविध विकासकामांचे लोकार्पण
शेतकरी प्रशिक्षण केंद्र, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासह दादासाहेब जे. टी. महाजन स्मारकाचे होणार उद्घाटन
जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दूध संघाच्या प्रांगणात विविध महत्त्वपूर्ण विकासकामांच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
- राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून दूध संघाचे संस्थापक चेअरमन तथा माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण लोकार्पण करण्यात येणार आहे.
यासोबतच दूध संघाच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन, तसेच मुख्य दुग्धशाळेतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण व वाढीव क्षमता प्रकल्पाचे उद्घाटन देखील यावेळी होणार आहे. या प्रकल्पांमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होण्यासोबतच दुग्धशाळेतील सांडपाण्याचे अधिक प्रभावीपणे व्यवस्थापन होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन असतील. प्रमुख पाहुणे म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण राहणार आहेत.
तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम, खासदार स्मिताताई वाघ, विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार अनिल पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार अमोल चिमणराव पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
या विविध विकासकामांच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्यास दूध संघाचे सर्व सभासद व सदस्यांनी गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दूध संघाच्या प्रांगणात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन दूध संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण आणि कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी केले आहे.
