“शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू हा माझा खरा पुरस्कार आहे, असे माझे वडील श्रद्धेय मोठेभाऊ नेहमी सांगत असत. त्यांचाच विचारांचा वारसा पुढे नेत, आज येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि तेज पाहून भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फाली (FALI) उपक्रमाच्या याच विद्यार्थ्यांमधून घडतील, असा मला दृढ विश्वास वाटतो,” असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.
जैन इरिगेशन आणि भागीदार कंपन्यांच्या वतीने आयोजित ‘फाली’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना ते बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या हस्ते फालीच्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बिझनेस प्लॅन आणि इन्होव्हेशन्स स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. व्यासपीठावर अथांग जैन, फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बेरी आदी मान्यवर उपस्थित होते.
जैन तंत्रज्ञानामुळे केळी फ्रुट क्षेत्रात देशात ऐतिहासिक विक्रम
अशोक जैन यांनी सांगितले की, जैन इरिगेशनच्या पाईप, ठिबक सिंचन आणि टिश्यू कल्चर तंत्रज्ञानामुळे जळगावसह देशातील केळी लागवडीत मोठी क्रांती झाली आहे. जळगावातून सुरू झालेली केळीची लागवड आज महाराष्ट्र, कर्नाटक ते थेट मणिपूरपर्यंत पोहोचली आहे. टिश्यू कल्चरद्वारे विकसित ‘ग्रँड नाईन’ जातीच्या केळीला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असून, मागील वर्षी भारतातून सुमारे ४,४०० कोटी रुपयांची केळी निर्यात झाली आहे.
”भारत देशाच्या एकूण फळ निर्यातीमध्ये ऐतिहासिक विक्रम करत केळीने यावर्षी प्रथम स्थान मिळविले आहे. जागतिक बाजारपेठेत भारताने ५% वाटा मिळविला असून, २०४७ च्या अमृत काळात देशाची केळी निर्यात ५ पटीने वाढेल.”
— अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन
वातावरण बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी केळी उत्पादनाचे नवीन मॉडेल (तंत्रज्ञान) विकसित करणे ही काळाची गरज बनली आहे. आगामी काळात केळीच्या आणखी दोन नव्या जाती बाजारात आणण्याचे काम सुरू असून टिश्यू कल्चर रोपांची उत्पादन क्षमताही वाढविली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
’फाली’ स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:
या उपक्रमात कृषी इन्व्होव्हेशन आणि कृषी बिझनेस प्लॅनमध्ये प्रत्येकी ५३ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील पहिल्या पाच विजेत्या शाळा पुढीलप्रमाणे:
१. कृषी इन्व्होव्हेशन सादरीकरण:
प्रथम: उदयचल हायस्कूल (विक्रोळी, मुंबई)
द्वितीय: शारदाबाई पवार विद्यानिकेतन (शारदानगर, बारामती)
तृतीय: मार्तंडराव पाटील कपगटे हायस्कूल (जंभाली, भंडारा)
चतुर्थ: रावजी फटे विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय (खराशी, भंडारा)
पाचवा: न्यू इंग्लिश स्कूल (मोहपा, नागपूर)
२. कृषी बिझनेस प्लॅन:
प्रथम: शारदाबाई पवार विद्यानिकेतन (शारदानगर, बारामती)
द्वितीय: पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय (अकुलखेडा, ता. चोपडा, जि. जळगाव)
तृतीय: एस.एस.पाटील विद्यामंदिर (चहार्डी, चोपडा, जि. जळगाव)
चतुर्थ: कुलस्वामी खंडेराय विद्यालय (हिवरे, जुन्नर, पुणे)
पाचवा: उदयचल हायस्कूल (विक्रोळी, मुंबई)
मान्यवर व विद्यार्थ्यांचे मनोगत
या प्रसंगी कार्तिक कुमार (मुंबई), तनिष्का बडगुजर (बड़वानी, म.प्र.), शर्वरी चव्हाण (बारामती) आणि सुज्ञा हडवळे (जुन्नर) या विद्यार्थ्यांनी फाली उपक्रमातून मिळालेल्या अनुभवांवर प्रकाश टाकला. माजी विद्यार्थी कृतिका लकडे व अजिंक्य डोंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
डॉ. आर. एस. मसली (गोदरेज अॅग्रोवेट), मुनेश सक्सेना (आयटीसी), उपमा गोयल (स्टार मॅग्री), मिलकेश राठोड (प्रॉम्ट) आणि सायली नागरे (अमूल) या कंपनी प्रतिनिधींनी आपले अनुभव सांगितले. फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बेरी यांनी भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली, तर सीईओ शर्बोनी पोदार यांनी आगामी काळात फालीचा विस्तार देशातील सर्व राज्यांमध्ये करण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमाला जैन इरिगेशनसह गोदरेज अॅग्रोवेट, युपीएल, स्टार अॅग्री, रॅलीज इंडिया, ओमनिवोअर, प्रॉम्पट, एसबीआय फाउंडेशन, अमूल आणि उज्जीवन या नामांकित कंपन्यांचे सहकार्य लाभत आहे.
तिसरा टप्पा ७ जूनपासून.
फाली संमेलनाचा समारोपाचा तिसरा टप्पा ७ व ८ जून रोजी होणार आहे. ७ जून रोजी विद्यार्थी जैन इरिगेशनच्या शेती संशोधन व विकास केंद्राला भेट देऊन तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तर ८ जून रोजी बिझनेस प्लॅन आणि इन्होव्हेशन्सच्या अंतिम सादरीकरणानंतर विजेत्यांना पारितोषिके देऊन १२ व्या फाली संमेलनाचा समारोप होईल.
