कर्तृत्वाचा धडाका अन् विकासाचे व्हिजन; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहराच्या १७ व्या महापौर तथा कार्यक्षम लोकप्रतिनिधी दीपमाला काळे यांचा १३ जुलै रोजी वाढदिवस साजरा होत आहे. ६ फेब्रुवारी रोजी महापौरपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी प्रशासनाला गतिमान करत विकासकामांना वेग देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याची शैली, स्वच्छता, पर्यावरण आणि शहर विकासाबाबतचा स्पष्ट दृष्टिकोन यामुळे त्यांनी जळगावकरांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, अतिक्रमण निर्मूलन आणि महापालिकेचा महसूल वाढ या पंचसूत्रीवर भर देत विविध उपक्रम राबवले. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहीम, बाजारपेठांमध्ये ‘माझे दुकान, माझी कचराकुंडी’ अभियान, स्वच्छता मोहिमा आणि नागरिक सहभागातून शहर सुशोभीकरणाचे प्रयत्न विशेष ठरले. 
याशिवाय, महापौर दीपमाला काळे यांनी यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने जळगाव ते पंढरपूर सायकल वारी पूर्ण करत सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठलभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. सायकलवारीच्या माध्यमातून त्यांनी सुदृढ आरोग्य, इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धन यांचा संदेश राज्यभर पोहोचवला.
जळगावच्या विकासासाठी दूरदृष्टी
महापौरांनी शहराच्या भविष्यासाठी काही महत्त्वाकांक्षी उद्दिष्टेही निश्चित केली आहेत. महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल प्रशासन, अमृत पाणीपुरवठा योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी, सक्षम ड्रेनेज व्यवस्था, तसेच ‘हरित जळगाव’ संकल्पनेअंतर्गत मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड आणि उद्यानांचे सुशोभीकरण यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
जनतेशी थेट संवाद
महापौर दीपमाला काळे यांच्या कार्यशैलीतील नम्रता, अभ्यासू वृत्ती आणि नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न यामुळे त्या अल्पावधीत लोकप्रिय ठरल्या आहेत. राज्य शासनाच्या सहकार्याने जळगावसाठी विविध विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठीही त्या सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.
विठ्ठल चरणी विकासाचा संकल्प.
नुकत्याच झालेल्या पंढरपूर सायकल वारीदरम्यान त्यांनी विठ्ठलाच्या चरणी जळगावच्या सर्वांगीण विकासाचा, शहराच्या समृद्धीचा आणि शेतकरी सुखाचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्षम नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेल्या महापौर दीपमाला काळे यांना वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहराचा विकास अधिक वेगाने होत राहो, अशा शुभेच्छा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
