जळगाव | प्रतिनिधी
भारताचे माजी सरन्यायाधीश तथा कायदेपंडित भूषण गवई यांची मंगळवारी (दि. ८ जुलै) जळगाव येथील अजिंठा रेस्ट हाऊस येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष आशिष सपकाळे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आशिष सपकाळे यांनी भूषण गवई यांना पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
या भेटीदरम्यान जळगाव शहरातील सामाजिक, शैक्षणिक, कायदेविषयक तसेच विविध सार्वजनिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजहित, सामाजिक परिवर्तन, कायद्याविषयी जनजागृती आणि जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.
यावेळी कायदेतज्ज्ञ राजेश झाल्टे तसेच सामाजिक नेते मुकुंदराव सपकाळे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत झालेली ही भेट आत्मीय, प्रेरणादायी आणि समाजोपयोगी ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
भूषण गवई यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे सामाजिक प्रश्नांकडे व्यापक आणि विधायक दृष्टीकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाल्याचे आशिष सपकाळे यांनी सांगितले. तसेच जळगावच्या सामाजिक आणि वैचारिक उन्नतीसाठी अशा संवादांची आवश्यकता असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
ही सदिच्छा भेट जळगाव शहरासाठी अभिमानाची बाब ठरली असून, भूषण गवई यांच्या न्यायव्यवस्था आणि समाजहितासाठीच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
