अधिवेशन असो की आपत्ती… घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचणारे नेतृत्व; ना. गिरीशभाऊ महाजन!

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन!

जळगाव | प्रतिनिधी

लोकशाही व्यवस्थेत विधानसभेचे अधिवेशन हे राज्याच्या विकासासाठी धोरणे ठरविण्याचे आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे सर्वोच्च व्यासपीठ मानले जाते. मात्र, त्याचवेळी राज्याच्या एखाद्या भागात नैसर्गिक आपत्ती कोसळली, तर संकटग्रस्त नागरिकांपर्यंत सर्वप्रथम पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविणारे नेतृत्व अधिक महत्त्वाचे ठरते. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अशीच कार्यशैली दाखवत प्रशासन आणि जनतेत विश्वास निर्माण केला आहे.

राज्यात मुसळधार पाऊस, पूर, ढगफुटी, भूस्खलन, इमारती कोसळणे आणि विविध दुर्घटनांची मालिका सुरू असतानाच विधानसभेचे कामकाजही सुरू होते. एका बाजूला सभागृहातील महत्त्वाचे निर्णय आणि दुसऱ्या बाजूला राज्यभरातील आपत्ती व्यवस्थापन अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळताना ना. महाजन यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्यावर भर दिला.

मध्यरात्रीची धाव; घटनास्थळी थेट उपस्थिती

४ जुलै रोजी मंत्रालयात रात्री उशिरापर्यंत राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी रेल्वेने नाशिकचा प्रवास केला. दुसऱ्या दिवशी नाशिकमधील नियोजित कार्यक्रम पूर्ण ते पुन्हा मुंबईत दाखल झाले. दरम्यान, मानखुर्द येथे इमारत कोसळल्याची दुर्घटना घडताच त्यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्याचा आढावा घेत अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाला आवश्यक सूचना देत मदतकार्याला गती दिली.

ढगफुटीचा इशारा मिळताच थेट त्र्यंबकेश्वरकडे रवाना

६ जुलै रोजी विधानसभेतील कामकाज पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापनाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्याचवेळी त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीचा इशारा मिळताच ना. महाजन यांनी कोणताही विलंब न लावता इगतपुरीमार्गे त्र्यंबकेश्वरकडे धाव घेतली.

मेटघर किल्ला परिसरातील धोकादायक भागात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराची मोहीम त्यांनी स्वतः घटनास्थळी उभे राहून पाहिली. रात्री उशिरापर्यंत प्रशासनासोबत समन्वय साधत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. दुसऱ्या दिवशी साधुग्राम परिसराची पाहणी करून पूरस्थितीवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचे निर्देश दिले.

जव्हार, झांजरोळी धरण आणि गोदावरी पूरस्थितीचा आढावा

त्यानंतर पालघर जिल्ह्यातील जव्हार परिसराचा दौरा करून त्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. मुसळधार पावसात रात्री उशिरापर्यंत झांजरोळी धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून संभाव्य धोक्यांचे मूल्यांकन केले आणि संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.

८ जुलै रोजी पुन्हा रेल्वेने नाशिक गाठत त्यांनी गोदावरी नदी परिसरातील पूरस्थितीची पाहणी केली. नदीकाठच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मोशी दुर्घटनास्थळीही तातडीने भेट

नाशिक दौरा पूर्ण होताच ना. महाजन थेट पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे पोहोचले. कचरा डेपो परिसरातील दुर्घटनेनंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्याचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देत नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.

बैठकांपेक्षा घटनास्थळी उपस्थित राहण्यावर भर

या संपूर्ण कालावधीत एक गोष्ट प्रकर्षाने दिसून आली ती म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन म्हणजे केवळ मंत्रालयातील बैठका नव्हेत, तर संकटग्रस्त भागात प्रत्यक्ष उपस्थित राहून निर्णय घेणे, प्रशासनाला दिशा देणे आणि नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणे.

रेल्वेचा सातत्याने केलेला प्रवास, रस्तामार्गावरील धावपळ, मध्यरात्रीचे दौरे, सलग बैठका आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा नव्या आपत्तीग्रस्त भागात उपस्थिती ही त्यांची कार्यशैली केवळ प्रशासकीय कर्तव्यापुरती मर्यादित न राहता जनतेप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष देणारी ठरली आहे.

आज राज्यातील अनेक नागरिकांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे—संकट कितीही मोठे असो, ना. गिरीशभाऊ महाजन घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतील आणि प्रशासनाला गती देतील. आपत्ती व्यवस्थापनात प्रत्यक्ष उपस्थिती, तातडीचे निर्णय आणि प्रशासनाशी सातत्यपूर्ण समन्वय या कार्यपद्धतीमुळे त्यांची भूमिका राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची ठरत असल्याची चर्चा आहे.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *