भरधाव केमिकल टँकरची कंटेनरला जोरदार धडक; सबगव्हाण टोलनाका हादरला

पारोळा/जळगाव | प्रतिनिधी

धुळेकडून पारोळ्याकडे येत असलेल्या केमिकल टँकरचा सबगव्हाण टोलनाक्यावर शुक्रवारी (४ जुलै) रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील टँकरने टोलनाक्याजवळ पुढे उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर टँकरचा पुढील टायर फुटून वाहनाने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेत टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला दोन जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली होती, मात्र पोलिसांनी नंतर एकाच व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस, महसूल प्रशासन आणि पारोळा नगरपरिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने त्वरित आग आटोक्यात आणत मोठी दुर्घटना टाळली. टँकरमध्ये असलेल्या रसायनामुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती. त्यामुळे परिसरात खबरदारीचे उपाय तातडीने राबविण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त टँकरचा क्रमांक GJ-18 BV-8315 असून तो गुजरातहून ओडिशाकडे जात होता. टँकरमध्ये टोल्युइन डायआइसोसायनेट (Toluene Diisocyanate – TDI) हे औद्योगिक रसायन होते. हे अत्यंत क्रियाशील (Highly Reactive) रसायन असून त्याचा वापर प्रामुख्याने लवचिक पॉलीयुरेथेन फोम, कोटिंग्ज, ॲडेसिव्ह्ज (चिकटवणारे पदार्थ) आणि इलास्टोमर्स तयार करण्यासाठी केला जातो.

सुदैवाने अपघातात टँकरमधील रसायनाची कोणतीही गळती झाली नसल्याने मोठा पर्यावरणीय किंवा आरोग्यविषयक धोका टळला. प्रशासनानेही रसायन सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.

अपघातानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने धुळे-पारोळा मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे दोन्ही दिशांना सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. घटनास्थळी क्रेन बोलावून अपघातग्रस्त टँकर व कंटेनर हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

या दुर्घटनेमुळे काही काळ टोलनाका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मृत चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण काय, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले की अन्य काही तांत्रिक बिघाड झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, टोलनाक्यांजवळ अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *