शिंदे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या अडचणीत वाढ; आंदोलनातील भाषणानंतर आणखी एक गुन्हा नोंद

जळगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव शहरात पोलीस प्रशासनाविरोधात आयोजित जनआक्रोश धरणे आंदोलनादरम्यान केलेल्या भाषणामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आंदोलनातील कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी त्यांच्या विरोधात आणखी एक स्वतंत्र अदखलपात्र (एनसी) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यापूर्वी आंदोलनादरम्यान चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्याविषयी कथितरीत्या अवमानकारक व बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी उन्मेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याच आंदोलनात एका व्यक्तीला उद्देशून कथितरीत्या शिवीगाळ व अवमानास्पद शब्दांचा वापर केल्याच्या आरोपावरून स्वतंत्र कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी प्र.चा (ता. चाळीसगाव) येथील किसनराव जोर्वेकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ तसेच पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविरोधात रविवारी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यासमोर जनआक्रोश धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान उन्मेश पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका करत भाषण केले. या भाषणात पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, फारुख खान उर्फ बाबा ठेकेदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आंदोलनादरम्यान सार्वजनिक व्यासपीठावरून त्यांना उद्देशून शिवीगाळ करण्यात आली व त्यामुळे त्यांची सार्वजनिक बदनामी झाली. या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एनसी क्रमांक ६२६/२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५२ व ३५६(३) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच आंदोलनातील भाषणावरून दोन स्वतंत्र कायदेशीर कारवाया झाल्याने चाळीसगावसह जळगाव जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास चाळीसगाव शहर पोलीस करत असून आंदोलनावेळी उपलब्ध झालेल्या व्हिडिओ, ध्वनिचित्रफिती आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. :::

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *