जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सध्या सुमारे 62 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून हा साठा अंदाजे सात महिने पुरेल एवढाच असल्याने भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महानगरपालिका प्रशासनाला विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहरात पूरक जलस्रोत म्हणून 43 विहिरी आणि 60 बोअरवेल कार्यरत आहेत. उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करण्याबरोबरच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी संधारण) धोरणाची कठोर अंमलबजावणी करण्यावर उपमहापौरांनी भर दिला आहे.
शहरातील सर्व मोठे बांधकाम प्रकल्प, व्यापारी संकुले, गृहसंकुले, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये पावसाचे पाणी संधारण व्यवस्था प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
पाणी बचतीसाठी 20 टक्के लक्ष्य
महानगरपालिकेने शहरातील एकूण पाणी वापरामध्ये किमान 20 टक्के बचत करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी जलवाहिन्यांमधील गळती रोखणे, अनधिकृत पाणी वापरावर कारवाई, पाण्याचा पुनर्वापर आणि व्यापक जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे.
कार वॉश व्यवसायांवर नियंत्रण
पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या नवीन कार वॉश व्यवसायांना किंवा तत्सम प्रकल्पांना परवानगी देताना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना उपमहापौरांनी दिल्या आहेत. अशा व्यवसायांनी पुनर्वापरित किंवा प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाणी चोरी आणि गळतीवर कठोर कारवाई
शहरातील सर्व जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करून गळतीग्रस्त भागांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अनधिकृत कनेक्शन, बायपास लाईन, मीटरमध्ये छेडछाड आणि पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
RO वेस्ट वॉटरच्या पुनर्वापराचे आवाहन
घरगुती आणि व्यावसायिक स्तरावर RO वेस्ट वॉटरचा वापर साफसफाई, फ्लशिंग, बागकाम आणि इतर दुय्यम कामांसाठी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
“माझे पाणी – माझा अभिमान” अभियान
पाणी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी “माझे पाणी – माझा अभिमान” या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि नागरिकांच्या सहभागातून व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे.
उपमहापौर मनोज सुरेश चौधरी म्हणाले, “वाघूर धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आजपासूनच प्रत्येक जळगावकराने पाणी बचतीची सवय लावणे आवश्यक आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर आणि अपव्यय रोखणे ही काळाची गरज आहे. प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून जळगाव शहर जलसुरक्षित बनवूया.”
