जैन हिल्स येथे उद्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम; पंतप्रधान मोदींच्या हस्ते ₹2,400 कोटींचे अनुदान वितरण
जळगाव, दि. 18 (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर देशभरात 19 जून रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) जळगाव कार्यालयाच्या वतीने जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या जैन हिल्स येथील गांधी तीर्थ परिसरातील कस्तुरबा सभागृहात गुरुवारी (दि. 19) सायंकाळी 4 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन माध्यमातून सहभागी होणार असून त्यांच्या हस्ते देशभरातील लाभार्थ्यांना सुमारे ₹2,400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने वितरित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान मिळणार आहे.
जळगाव येथे आयोजित प्रादेशिक कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ तसेच जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी आणि सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित यांचीही उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, नियोक्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून रोजगार व सामाजिक सुरक्षा योजनांविषयी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
दरम्यान, नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात केंद्रीय कामगार व रोजगार, युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया तसेच कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या या अनुदान वितरणामुळे देशभरातील 15 लाखांहून अधिक नागरिकांना अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
PM-VBRY ही केंद्र सरकारची रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना असून प्रथमच संघटित क्षेत्रात रोजगार मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाएवढी, कमाल ₹15 हजारांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच नवीन रोजगार निर्माण करणाऱ्या नियोक्त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळतो.
या योजनेद्वारे पुढील दोन वर्षांत देशभरात 3.5 कोटींहून अधिक रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पुणे क्षेत्रात आतापर्यंत या योजनेअंतर्गत 75,711 कर्मचाऱ्यांना ₹42.79 कोटींपेक्षा अधिक लाभ देण्यात आला असून 6,351 नियोक्त्यांना ₹145.16 कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले आहे.
देशभरातील सुमारे 200 ठिकाणी एकाचवेळी आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमात 9 हजारांहून अधिक नियोक्ता प्रतिनिधी आणि 45 हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. रोजगार निर्मिती, रोजगाराला प्रोत्साहन आणि सामाजिक सुरक्षेचा विस्तार या केंद्र सरकारच्या उद्दिष्टांना बळकटी देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे EPFO प्रशासनाने म्हटले आहे.
जैन हिल्स येथे होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात जळगाव कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या प्रादेशिक कार्यक्षेत्रातील लाभार्थी, कर्मचारी आणि नियोक्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी व सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित यांनी केले आहे.
