चाळीसगावात माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध NCR दाखल
PSI घुले यांना शिवीगाळ व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप; BNS कलम 352 व 356(3) अंतर्गत नोंद
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) घुले यांच्याबाबत शिवीगाळ व बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे. गोपनीय अंमलदाराने दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात NC क्रमांक 613/2026 नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या आंदोलनादरम्यान उन्मेष पाटील यांनी PSI घुले यांच्याविषयी आक्षेपार्ह, शिवीगाळयुक्त तसेच बदनामीकारक शब्दांचा वापर केल्याची तक्रार करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 352 आणि 356(3) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.
सदर प्रकरणात पोलिसांनी NCR दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे चाळीसगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आगामी काळात या प्रकरणाला कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

— धाडस महाराष्ट्र न्यूज