डॅशिंग महापौर! पहाटेपासून रस्त्यावर… सलग ६ तास पूरग्रस्त भागांची पाहणी!

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी (३१ जुलै) पहाटेपासूनच शहरातील विविध बाधित भागांची पाहणी करत सलग सहा तास प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी साचलेल्या ठिकाणांचा निचरा, नाल्यांची सफाई आणि नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळीच निर्देश दिले.

महापौरांनी स्टेडियम कॉम्प्लेक्स, घाणेकर चौक, तुकाराम वाडी, पांडे चौक तसेच राधाकृष्ण मंगल कार्यालय परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांची माहिती घेत तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अजिंठा चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. यावेळी महापौरांनी नाल्यांवरील अडथळे दूर करण्यासाठी काही दुकानांचे ढापे हटविण्याचे आदेश दिले. नाल्यातील गाळ व चेंबर साफ करून पाण्याचा निचरा सुरळीत करण्यात आला. महापौरांनी स्वतः घटनास्थळी थांबून हे काम पूर्ण करून घेतले.

महात्मा गांधी मार्केटच्या तळमजल्यावरील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच महापौरांनी मनपा अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने दुकानांतील पाणी बाहेर काढण्याचे आदेश दिले. या तातडीच्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

पांडे चौकातील रामदेव बाबा मंदिर परिसरात सिंधी कॉलनीकडून आलेले पाणी तुकाराम वाडीतील घरांमध्ये शिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापौरांनी त्वरित अधिकाऱ्यांना पाचारण केले. कलव्हर्ट तोडून नाल्याचा मार्ग मोकळा करण्यात आला, त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

भाजी विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश

गांधी मार्केट परिसरात काही भाजी विक्रेते रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे पाहून महापौरांनी नाराजी व्यक्त केली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा फेकणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले. भविष्यातही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या पाहणी दौऱ्यात महापालिका आयुक्त आदित्य जीवने, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त पंकज गोसावी, शहर अभियंता योगेश बोरोले, आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, अभियंता योगेश वाणी, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर यांच्यासह मनपाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *