महाराष्ट्रात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांसाठी नवे नियम; उल्लंघन केल्यास थेट कारवाई.

महाराष्ट्रात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांसाठी नवे नियम; उल्लंघन केल्यास थेट कारवा

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला सुरुवात; ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणेही बंधनकारक

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, बेकऱ्या, मिठाई दुकाने आणि अन्न प्रक्रिया केंद्रांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कडक नियमावली लागू केली आहे. ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व खाद्य व्यावसायिक आस्थापनांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून, स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे पालन करणाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसले तरी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

किचनसाठी कडक नियम

FDA ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हॉटेल, रेस्टॉरंट्स, इटरीज, धाबे, मिठाई दुकाने, बेकऱ्या आणि अन्न प्रक्रिया केंद्रांच्या स्वयंपाकघरांमध्ये विशिष्ट मानके पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे.

स्वयंपाकघराच्या भिंती व फरशी धुता येण्याजोग्या टाईल्सच्या असाव्यात, जेणेकरून ओलावा आणि घाण साचणार नाही. किचनमध्ये पुरेशा प्रमाणात हवा खेळती राहण्यासाठी एक्झॉस्ट फॅन बसवणे आवश्यक आहे. तसेच कच्चा माल आणि शिजवलेल्या अन्नासाठी स्वतंत्र विभाग असावा. कच्चे आणि शिजलेले अन्न एकत्र ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.

याशिवाय शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ पूर्णपणे वेगवेगळ्या ठिकाणी साठवणे व हाताळणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता राखण्यासाठी नियमित पेस्ट कंट्रोल करणे आवश्यक असून, किचनमध्ये झुरळे, पाल, उंदीर किंवा अन्य कीटक आढळल्यास संबंधितांवर थेट कारवाई केली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवण्याचाही नियम करण्यात आला आहे.

ग्राहकांसाठी सुविधा अनिवार्य

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, हँडवॉश, साबण आणि स्वच्छ टॉवेलची व्यवस्था ठेवणे आता बंधनकारक असेल. ग्राहकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने या सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मोफत पिण्याच्या पाण्याचे आदेश

अनेक ठिकाणी ग्राहकांना विचारणा न करता बाटलीबंद पाणी देऊन त्याचे शुल्क आकारले जाते. या प्रथेला आळा घालत FDA ने सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना ग्राहकांसाठी शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहकांकडून केवळ पाण्यासाठी अनावश्यक आर्थिक भार टाकू नये, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

“ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्यविषयक नियमांचे काटेकोर पालन करा. अस्वच्छता किंवा नियमभंग आढळल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

या मोहिमेमुळे राज्यातील खाद्य व्यवसायांमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्राहकांनाही अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *