शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नाय
यावल तालुक्यातील सावखेडा सिम व डांभुर्णी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे केले स्वागत
जळगाव, दि. १५ जून २०२६ : उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा सुरू झाल्या असून जिल्हाभरात उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या सावखेडा सिम व डांभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
प्रवेशोत्सवानिमित्त शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. लहानग्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने आणि आनंदी वातावरणात मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या निरागस स्वागताने त्या काही क्षणांसाठी भारावून गेल्या.
विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण व्हावे, शिक्षणाची गोडी लागावी आणि प्रवेशोत्सव संस्मरणीय ठरावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सजविलेल्या बैलगाडीवरून विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत करिश्मा नायर स्वतः सहभागी झाल्या. मिरवणूक शाळेत पोहोचल्यानंतर त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
चिमुकलीने घेतली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मुलाखत
सावखेडा सिम येथील शाळेत प्रवेशोत्सवानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या कु. कोमल सोनवणे हिने मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली. नायर यांनी तत्काळ होकार देत तिच्या उत्साहाला प्रोत्साहन दिले.
कोमलने स्वतःच्या हस्ताक्षरात प्रश्न तयार करून आत्मविश्वासाने मुलाखत घेतली. तिच्या या धाडसी प्रयत्नाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यालाही उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, केंद्रप्रमुख विजय ठाकूर, मुख्याध्यापक संदीप पाटील, शिक्षक नामदेव सूर्यवंशी, आशा तडवी, धीरज तायडे, पुष्पा तायडे, निखिल संभे, शिवाजी रोहनकर, आशिष भैसारे, अमोल राऊत तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मीना तडवी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.
