नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
जळगाव : सुरक्षा नगर परिसरातील नागरिकांकडून पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने उपमहापौर मनोज चौधरी यांनी परिसराला भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी महापालिकेचे पाणीपुरवठा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच आरोग्य निरीक्षक यांना घटनास्थळी बोलावून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
सुरक्षा नगरातील नागरिकांनी पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याची, पाणी कमी वेळ सोडले जात असल्याची तसेच संबंधित वॉलमन तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याची व्यथा मांडली. याशिवाय गटार सफाई व स्वच्छतेच्या कामांमध्येही अनियमितता असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
यावेळी उपमहापौर मनोज चौधरी म्हणाले की, “प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व पुरेसे पाणी मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही.”
नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले. उपमहापौरांच्या हस्तक्षेपामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
