उपमहापौर ॲक्शन मोडवर; एम. जे. महाविद्यालयाजवळील धोकादायक नाल्याची पाहणी, तातडीने जाळ्या बसवण्याचे आदेश

  • उपमहापौर ॲक्शन मोडवर; एम. जे. महाविद्यालयाजवळील धोकादायक नाल्याची पाहणी, तातडीने जाळ्या बसवण्याचे आदेश

जळगाव | प्रतिनिधी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत जळगावचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी एम. जे. महाविद्यालय परिसरातील धोकादायक उघड्या नाल्याची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असलेल्या या नाल्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मजबूत लोखंडी जाळ्या बसवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

एम. जे. महाविद्यालय परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, जिम आणि संगणक प्रशिक्षण केंद्रे असल्याने या मार्गावर दररोज हजारो विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ असते. रस्त्यालगत असलेला हा मोठा नाला अनेक ठिकाणी उघडा पडल्याने पावसाळ्यात गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

उपमहापौर मनोज चौधरी यांनी शहर अभियंता योगेश बोरोले तसेच आर. टी. पाटील यांच्यासह प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नाल्याची अवस्था अत्यंत धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी नाल्याच्या भिंती कमकुवत झाल्या असून पावसाच्या पाण्यामुळे त्या कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच नाल्यालगत खाद्यपदार्थांच्या गाड्या असून तेथे शेकडो विद्यार्थी नियमित ये-जा करतात.

पाहणीनंतर उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना दोन महत्त्वाचे आदेश दिले.

१) तत्काळ लोखंडी जाळ्या बसवा

नाल्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीला वेळ लागू शकतो, त्यामुळे अपघात टाळण्यासाठी उघड्या भागांवर मजबूत लोखंडी जाळ्या तातडीने बसवण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले.

२) कायमस्वरूपी दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करा

नाल्याची केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता संपूर्ण आणि शाश्वत उपाययोजना करण्यासाठी तातडीने खर्चाचे अंदाजपत्रक (इस्टिमेट) तयार करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी अधिकाऱ्यांनीही नाल्याची स्थिती गंभीर असल्याचे मान्य केले. पावसाळ्यापूर्वी आवश्यक सुरक्षा उपाययोजना पूर्ण करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मनपा प्रशासनाने तातडीने काम सुरू करावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

“नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ देणार नाही. तातडीच्या उपाययोजनांसह नाल्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात येईल,” असा निर्धार उपमहापौर मनोज चौधरी यांनी व्यक्त केला.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *