जळगाव : शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. यावेळी रिंग रोडची दुरवस्था, अतिक्रमण, खड्डे बुजविण्याची रखडलेली कामे आणि विविध विकास प्रकल्पांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली.
रिंग रोडवरील रस्त्यांची बिकट अवस्था आणि त्यामुळे घडणारे अपघात यावरून महापौरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. बैठकीसाठी वारंवार बोलावूनही संबंधित अधिकारी उपस्थित राहत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. “नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून स्थानिक लोकप्रतिनिधींना जनतेसमोर उत्तर देणे कठीण झाले आहे,” असे सांगत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर भूमिका घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवरही महापौरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अतिक्रमण हटविल्यानंतर ते पुन्हा कसे होते, प्रशासनाचा वचक का राहत नाही, असा जाब त्यांनी विचारला. फेरीवाल्यांचे पुनर्वसन करून शहरातील प्रमुख रस्ते मोकळे करण्यासाठी ठोस नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच शहरात झोननिहाय पार्किंग लॉट उभारण्याच्या शक्यतांची तपासणी करण्याचे आदेश दिले.
महापालिकेची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवरही महापौरांनी नाराजी व्यक्त केली. कामे रखडविणाऱ्या जुन्या ठेकेदारांची कंत्राटे रद्द करून प्रामाणिक आणि सक्षम नवीन ठेकेदारांना संधी द्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. शहरातील बेशिस्त रिक्षा वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले.
महापालिकेच्या मालकीच्या पडीत जागांचा विकास करून उत्पन्न वाढविण्याचे पर्याय शोधण्याचे आदेश देण्यात आले. साने गुरुजी ग्रंथालय परिसरातील सुरू असलेल्या बांधकामाबाबत माहिती न दिल्यामुळे महापौरांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांसाठी या जागेचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
- याशिवाय शहरातील खड्ड्यांची डागडुजी अद्याप पूर्ण न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. चौक सुशोभीकरणाची कामे अर्धवट सोडणाऱ्या विकासकांची माहिती तातडीने गोळा करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, पंकज गोसावी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राजू लाकूडझोडे, शहर अभियंता योगेश बोरोले, नगर रचना विभागाचे अमोल पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

