माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एसएसबीटीतर्फे ‘प्रतिभा हाफ मॅरेथॉन’चे आयोजन
२१, १०, ५ आणि ३ किलोमीटरच्या स्पर्धा; विजेत्यांना रोख पारितोषिके, स्पर्धकांसाठी विशेष व्यवस्था
जळगाव : माजी राष्ट्रपती तथा एसएसबीटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या प्रथम चेअरमन प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एसएसबीटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सतर्फे ‘प्रतिभा हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने रविवार, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी तसेच समाजात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी धावपटूंना सामाजिक बांधिलकीचा संदेशही दिला जाणार आहे. 
स्पर्धेत २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा चार गटांचा समावेश आहे. २१ आणि १० किलोमीटरच्या स्पर्धा आरएफआयडी प्रणालीद्वारे आयोजित केल्या जाणार असून, धावपटूंच्या वेळेची अचूक नोंद ठेवण्यात येणार आहे.
विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके
तीन किलोमीटरच्या स्पर्धेसाठी ३५० रुपये, पाच किलोमीटरसाठी ५०० रुपये, १० किलोमीटरसाठी ६०० रुपये आणि २१ किलोमीटरसाठी ७०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. २१ किलोमीटरच्या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास १२ हजार रुपये, द्वितीय विजेत्यास ७,५०० रुपये आणि तृतीय विजेत्यास ४ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. १० किलोमीटरच्या स्पर्धेसाठीही आकर्षक रोख पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. विविध अंतरांच्या स्पर्धांमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र पुरस्कार ठेवण्यात आले आहेत.
प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट, धाव पूर्ण केल्यानंतर पदक, प्रमाणपत्र आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. धावण्याच्या मार्गावर पिण्याचे पाणी, बिस्किटे, चॉकलेट, लिंबूपाणी, एनर्जी ड्रिंक तसेच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

खान्देश सेंट्रल ग्राउंडपासून स्पर्धेला सुरुवात
सर्व स्पर्धांना खान्देश सेंट्रल ग्राउंड येथून सुरुवात होणार असून, विविध मार्गांवरून धावपटू पुन्हा याच ठिकाणी परतणार आहेत. २१ किलोमीटरची स्पर्धा सकाळी ६ वाजता, १० किलोमीटरची स्पर्धा सकाळी ६.३० वाजता, ५ किलोमीटरची स्पर्धा सकाळी ७ वाजता आणि ३ किलोमीटरची स्पर्धा सकाळी ७.३० वाजता सुरू होणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्राध्यापक डॉ. एम. के. रावलानी आणि डॉ. प्रदीप एम. सोलंकी मुख्य समन्वयक म्हणून काम पाहणार असून, प्रा. प्रवीण पाटील व डॉ. दिनेश पुरी रेस डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
या उपक्रमातून आरोग्य, व्यायाम आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
