जळगाव शहर स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे आक्रमक; कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा!

जळगाव शहर स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे आक्रमक; कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा!

बीव्हीजी कंपनीला दुप्पट क्षमतेची वाहने पुरवण्याचे निर्देश; दिवाळीपूर्वी शहर चकाचक करण्यासाठी महापौरांचा विभागांना अल्टिमेटम

जळगाव (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियाना’अंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील १ ते ५ प्रभागांची पाहणी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी संबंधित विभागांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्वच्छतेतील त्रुटींवर चर्चा करत महापौरांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. तसेच कचरा संकलनासाठी आवश्यक वाहने तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश बीव्हीजी कंपनीला दिले.

कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई

स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, विद्युत विभाग आणि पाणीपुरवठा विभागाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महापौरांनी प्रभागनिहाय स्वच्छतेचा आढावा घेतला. स्वच्छता निरीक्षकांनी योग्य नियोजन करून आपापले प्रभाग आदर्श आणि ‘मॉडेल वॉर्ड’ बनवावेत, असे त्यांनी सांगितले.

“स्वच्छता निरीक्षक हा संपूर्ण योजनेतील महत्त्वाचा दुवा आहे. नियोजन योग्य असेल तर संपूर्ण प्रभाग स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतो. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा,” अशा स्पष्ट सूचना महापौरांनी दिल्या.

बीव्हीजी कंपनीला धारेवर धरले

शहरात कचरा संकलनासाठी पुरेशा वाहनांची उपलब्धता नसल्याने स्वच्छतेच्या कामात अडथळे येत असल्याची बाब बैठकीत समोर आली. यावर महापौरांनी बीव्हीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. जुनी आणि नादुरुस्त वाहने तातडीने बदलून आवश्यकतेनुसार दुप्पट क्षमतेची वाहने उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले. जमा झालेला कचरा वेळेत उचलला जाईल, याची दक्षता घेण्यासही सांगितले.

तक्रारदारांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण झाल्यानंतर त्याची नोंद ठेवण्यासाठी स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम यांनी दैनंदिन डायरी अद्ययावत ठेवावी. तक्रार सोडवल्यानंतर संबंधित तक्रारदाराची स्वाक्षरी डायरीत घेणे अनिवार्य असल्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

उघडी शौचालये, नाले आणि धोकादायक इमारतींवर लक्ष

बैठकीत शहरातील विविध समस्यांवर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. ममुराबाद रस्ता आणि पिंप्राळा परिसरातील उघडी शौचालये हटवण्याचे आदेश देण्यात आले. आसोदा रोडवरील पुलाजवळील शौचालयाची स्वच्छता करण्यासह गोपाळपुरा नाल्याची तातडीने सफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास बांधकाम विभागाला सांगण्यात आले. तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्या वॉशिंग सेंटरवर कारवाई करण्याबाबत आणि ती आठवड्यातून केवळ दोन दिवस सुरू ठेवण्याच्या शक्यतेबाबत नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या मार्गावरील रस्ते सुस्थितीत ठेवण्यावरही भर देण्यात आला.

दिवाळीपूर्वी शहर स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देऊन सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले.

“दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर चकाचक आणि स्वच्छ झालेच पाहिजे. यासाठी सर्वच विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे,” असे महापौरांनी स्पष्ट केले.

आता महापौरांच्या निर्देशांनंतर संबंधित विभाग आणि बीव्हीजी कंपनीकडून कितपत प्रभावी अंमलबजावणी होते, तसेच दिवाळीपूर्वी शहरातील स्वच्छतेत किती सुधारणा होते, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *