“ही वृक्षतोड नव्हे… वृक्षांची हत्या!” ढाकेवाडीत परवानगीशिवाय झाडांची कत्तल; दोन वाहनांतून लाकूड नेल्याचा आरोप

ढाकेवाडीत बेकायदेशीर वृक्षतोडीचा आरोप; महापालिकेची परवानगी न घेताच मोठी झाडे तोडली, लाकूड दोन वाहनांतून नेल्याचा दावा

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील ढाकेवाडी परिसरात महापालिकेची आवश्यक परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

स्थानिकांच्या आरोपानुसार, नगरसेविका रेश्मा कुंदन काळे यांच्या सांगण्यावरून रस्त्यालगत असलेली मोठी झाडे आणि त्यांच्या विशाल फांद्या कुऱ्हाड तसेच आधुनिक वूड-कटिंग मशिनच्या सहाय्याने तोडण्यात आल्या. विशेष म्हणजे, संबंधित झाडांमुळे वाहतूक किंवा नागरिकांच्या सुरक्षेला कोणताही धोका नव्हता, असा दावा स्थानिकांनी केला आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काही तासांतच झाडे कापून त्यांचे तुकडे करण्यात आले. त्यानंतर कापलेले लाकूड दोन ‘छोटा हत्ती’ (पिकअप) वाहनांमध्ये भरून घटनास्थळावरून हलविण्यात आले. त्यामुळे या लाकडाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली का, याबाबतही नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे.

या घटनेदरम्यान महापालिकेची परवानगी घेण्यात आली होती का, तसेच वृक्षतोडीबाबत वन विभाग किंवा संबंधित यंत्रणांची मंजुरी होती का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वृक्षतोडीस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया

“या झाडांमुळे कोणालाही धोका नव्हता. तरीही परवानगीशिवाय कुऱ्हाड आणि कटिंग मशिनच्या सहाय्याने झाडे तोडण्यात आली. कापलेले लाकूड वाहनांमध्ये भरून नेले गेले. हा प्रकार अत्यंत गंभीर असून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे. ही केवळ वृक्षतोड नसून पर्यावरणाची हानी आहे.”

(टीप : या वृत्तातील आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आले आहेत. संबंधित नगरसेविका, महापालिका किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *