कर्मवीरांच्या कार्याला अनोखा सलाम! जळगावात भव्य महारांगोळी व जीवनदर्शन प्रदर्शन”

जळगावात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर आधारित जीवनदर्शन व महारांगोळी प्रदर्शनाचे आयोजन

१४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान नूतन मराठा महाविद्यालयात प्रदर्शन; प्रवेश विनामूल्य

जळगाव : थोर शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘कर्मवीर जीवनदर्शन व महारांगोळी प्रदर्शनाचे’ आयोजन जळगावात करण्यात आले आहे. नूतन मराठा महाविद्यालय, विद्यार्थी साहाय्यक समिती, जळगाव आणि रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरू तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माजी कुलगुरू मा. डॉ. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था, सातारा येथील कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे चेअरमन अनिलजी पाटील राहणार आहेत.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे कार्यकारी संचालक कमलाकर महागुणी तसेच जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे मानद सचिव निलेश भोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कर्मवीरांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी प्रवास

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची ओळख विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्या शैक्षणिक विचारांचा आणि समाजपरिवर्तनासाठी केलेल्या महान कार्याचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

विद्यार्थी साहाय्यक समिती, जळगावच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. समितीच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा समाजासमोर मांडण्याचाही या आयोजनामागील हेतू आहे.

महारांगोळी, दुर्मिळ छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती आकर्षण

१४, १५ आणि १६ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत हे प्रदर्शन दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थी, पालक आणि सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संपूर्ण जीवनप्रवासावर आधारित भव्य महारांगोळी, त्यांच्या जीवनकार्यावरील दुर्मिळ छायाचित्रे तसेच ध्वनिचित्रफितींचे (व्हिडिओ) विशेष सादरीकरण हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रदर्शनाचा जळगाव शहर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल. पी. देशमुख आणि डॉ. एस. एस. राणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *