जळगाव-बांभोरी मार्गावर भीषण अपघात! कार-कंटेनरच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू.

जळगाव-बांभोरी मार्गावर भीषण अपघात! कार-कंटेनरच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
गिरणा नदीच्या पुलावर समोरासमोर धडक; झुरखेडा गावातील दोन चुलत भावांसह तिसऱ्या तरुणाचाही दुर्दैवी अंत, गावावर शोककळा

जळगाव : जळगाव-बांभोरी मार्गावरील गिरणा नदीच्या पुलावर रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील दोन चुलत भाऊ आणि त्यांच्या एका मित्राचा समावेश आहे. एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने झुरखेडा गावावर शोककळा पसरली आहे.

रेल्वे स्थानकावरून परतताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, हरीश हिंमत चौधरी (वय २७), रवींद्र चौधरी (वय ३०) आणि पंकज प्रकाश चौधरी (वय ३०) हे तिघेही झुरखेडा येथील रहिवासी होते. हरीश आणि रवींद्र हे चुलत भाऊ होते. दहा दिवसांपूर्वी त्यांच्या काकांचे निधन झाले होते. दशक्रिया विधीसाठी आलेल्या त्यांचे आतेभाऊ सागर धनसिंग पाटील यांना गावी परत जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर सोडण्याकरिता तिघेही कारने जळगावला आले होते.

सागर पाटील यांना रेल्वे स्थानकावर सोडल्यानंतर तिघेही एमएच २८ बीके ४९४३ क्रमांकाच्या कारने झुरखेडा गावाकडे परतत होते. दरम्यान, बांभोरीजवळील गिरणा नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या कंटेनरशी त्यांच्या कारची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्णपणे चुराडा झाला. या दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांचा आक्रोश
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील मृतदेह जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली. आपल्या जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाइकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

एकाच गावातील तीन तरुणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने झुरखेडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *