महामार्ग दुर्घटनांतील सर्व मृतांच्या कुटुंबांना भरघोस नुकसानभरपाई द्या; नगरसेवक अरविंद देशमुख यांची मागणी
बायपासप्रकरणी गुन्हा दाखल; जळगाव शहरातील पाच मृत्यूंच्याही स्वतंत्र फिर्यादी घेऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३, पाळधी-जळगाव बायपास तसेच जळगाव शहरातील महामार्गावर झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना संबंधित कंत्राटदार कंपनीकडून तातडीने भरघोस आर्थिक मदत आणि जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षांकडे केली आहे.
पाळधी-जळगाव बायपासवरील कामाची दुरवस्था, ओव्हरब्रिजचा भराव खचणे, अपुरे बॅरिकेडिंग, सूचना फलक व रिफ्लेक्टरचा अभाव, प्रकाशव्यवस्था तसेच वाहतूक नियोजनातील त्रुटींबाबत देशमुख यांनी ८ ऑगस्ट २०२६ पासून NHAI, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता. संभाव्य जीवितहानीचा धोका त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता.
दरम्यान, बायपासवरील दुर्घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिसांनी ‘ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, जी.एम. दत्ता आणि संबंधित साईट अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा क्रमांक २६२/२०२६ दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा केवळ बायपास दुर्घटनेशी संबंधित असून जळगाव शहरातील महामार्गावर मृत्युमुखी पडलेल्या पाच नागरिकांच्या मृत्यूंचा त्यात समावेश नसल्याचा मुद्दा देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
जळगाव शहरातील महामार्ग दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या स्वतंत्र फिर्यादी घेऊन, तपासाअंती आवश्यकतेनुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. महामार्गाची धोकादायक स्थिती, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना, वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी किंवा संबंधित अधिकारी-कंत्राटदारांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
मंगला अर्जुन माळी, प्रेमराज शिवराम चौधरी, योगेश कडू महाजन, अनिरुद्ध सुरेश डहाके तसेच ममुराबाद–आसोदा बायपास सर्व्हिस रोडवरील दुर्घटनेनंतर उपचारादरम्यान मृत्यू झालेले शांताराम केशव पाटील यांच्यासह महामार्ग आणि बायपासवरील सर्व मृत्यूंची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रत्येक दुर्घटनेचे ठिकाण, महामार्गाची स्थिती, अपघाताचे संभाव्य कारण आणि उपलब्ध सुरक्षा उपाययोजनांचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यात यावा. ज्या प्रकरणात अपुरे बॅरिकेडिंग, सूचना फलक, रिफ्लेक्टर, प्रकाशव्यवस्थेचा अभाव, वाहतूक नियोजनातील त्रुटी अथवा संबंधित अधिकारी-कंत्राटदारांचा निष्काळजीपणा आढळेल, त्या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली.
तसेच संबंधित कंत्राटदार कंपनी, विमा कंपनी आणि इतर जबाबदार यंत्रणांची कायदेशीर व आर्थिक जबाबदारी निश्चित करून, लागू कायदे व विमा तरतुदींनुसार मृतांच्या कायदेशीर वारसांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महामार्ग दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांचीही स्वतंत्र माहिती संकलित करून त्यांना उपचारांचा खर्च आणि पात्रतेनुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, असेही देशमुख यांनी सांगितले.
“केवळ बायपासवरील एका प्रकरणात गुन्हा दाखल करून जळगाव शहरातील इतर मृत्यूंकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रत्येक मृत्यूची स्वतंत्र चौकशी करा, कुटुंबीयांच्या फिर्यादी नोंदवा, दोषींवर कायदेशीर कारवाई करा आणि सर्व पीडित कुटुंबांना न्याय मिळवून द्या. प्रत्येक कुटुंबाला कायदेशीर व आर्थिक न्याय मिळेपर्यंत हा पाठपुरावा थांबणार नाही,” असा ठाम इशारा नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दिला.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी NHAI, पोलीस प्रशासन, संबंधित कंत्राटदार कंपनी, विमा कंपनी आणि संबंधित विभागांची तातडीने संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक मृताच्या कुटुंबाबाबत ठोस निर्णय घ्यावा, कंपनीची आर्थिक जबाबदारी निश्चित करून नुकसानभरपाईची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
