जळगावातील बेरोजगार तरुणांच्या कर्जप्रकरणांना बँकांची दिरंगाई; मनसेचा आंदोलनाचा इशारा.

जळगावातील बेरोजगार तरुणांच्या कर्जप्रकरणांना बँकांची दिरंगाई; मनसेचा आंदोलनाचा इशारा

जळगाव, दि. ९ सप्टेंबर : मुख्यमंत्री अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार तरुणांची कर्जप्रकरणे बँकांकडून अकारण प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ पासून प्रलंबित असलेली पात्र प्रकरणे तातडीने मंजूर करावीत, अन्यथा लाभार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला.

मनसेच्या शिष्टमंडळाने बुधवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकारी आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या (DIC) अधिकाऱ्यांची सामूहिक बैठक घेऊन प्रलंबित प्रकरणांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे मनसेने सांगितले.

CIBIL तपासणीच्या नावाखाली विलंब?

जिल्हा उद्योग केंद्राकडून फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये बँकांकडे पाठविण्यात आलेली अनेक कर्जप्रकरणे अद्याप मंजूर झालेली नसल्याचा दावा मनसेने केला आहे. CIBIL तपासणीच्या नावाखाली दोन ते तीन महिने प्रकरणे प्रलंबित ठेवली जात असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना बँकांच्या वारंवार चकरा माराव्या लागत आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

सणासुदीचा व्यवसायाचा हंगाम वाया जाण्याची भीती

गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या काळात बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. छोट्या व्यावसायिकांसाठी हा महत्त्वाचा व्यवसायाचा हंगाम असतो. मात्र वेळेत कर्ज उपलब्ध झाले नाही तर हा संपूर्ण हंगाम हातातून जाऊ शकतो आणि शासनाच्या योजनेचा उद्देशच अपूर्ण राहू शकतो, अशी भूमिका मनसेने मांडली.

मनसेने सर्व प्रलंबित कर्जप्रकरणांचा तातडीने आढावा घेणे, फेब्रुवारी-मार्चपासून प्रलंबित प्रकरणांना प्राधान्य देणे, बँकांसाठी निश्चित कालमर्यादा ठरवणे तसेच जिल्हाधिकारी, DIC आणि लीड बँकेची संयुक्त आढावा बैठक घेण्याची मागणी केली आहे.

“बेरोजगार तरुणाला भीक नको, त्याला व्यवसायाची संधी हवी आहे. शासनाने योजना आणली, DIC ने प्रस्ताव पाठवले, तर बँकांच्या दिरंगाईमुळे तरुणांची स्वप्ने का थांबायची? शासनाचा लाभ कागदावर नको, तर प्रत्यक्ष तरुणाच्या हातात दिसला पाहिजे,” अशी भूमिका मनसेने मांडली.

प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही मनसेने दिला.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक, संजय मोती, राजेश मराठे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *