आषाढी एकादशी निमित्त मेहरुणमध्ये पर्यावरणपूरक दिंडी; विद्यार्थ्यांकडून इंधन बचत व पर्यावरण संवर्धनाचा संदे
मेहरुण | प्रतिनिधी : आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे पर्यावरणपूरक दिंडीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी इंधन बचत, ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देत परिसरात जनजागृती केली.
दिंडीत शाळेतील ‘माझी विद्यार्थी’ उपक्रमातील विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी तसेच इतर विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. “इंधन वाचवा – भविष्य घडवा”, “ऊर्जा बचत हीच खरी देशभक्ती”, “सायकल चालवा – इंधन वाचवा” आणि “पर्यावरण वाचवा – पृथ्वी वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांच्या हातातील आकर्षक संदेशफलकांमुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
या दिंडीत वारकरी परंपरेचा सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांना पेट्रोल, डिझेल, एलपीजी, वीज यांसारख्या ऊर्जा स्रोतांचा काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच सायकलचा वापर वाढविणे, अनावश्यक इंधनाचा वापर टाळणे आणि ऊर्जा बचतीची सवय अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
दिंडीतील पारंबीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.
या पर्यावरणपूरक दिंडीमुळे परिसरात इंधन बचत, ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत प्रभावी जनजागृती निर्माण झाली.
