दहीहंडीतील जखमी गोविंदांवर मोफत उपचार; चौधरी कुटुंबाची ७७ वर्षांची परंपरा आजही सुरू

दहीहंडीतील जखमी गोविंदांवर मोफत उपचार; चौधरी कुटुंबाची ७७ वर्षांची परंपरा आजही सुरू

जळगाव : जुने जळगाव परिसरात दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात जखमी होणाऱ्या गोविंदांवर मोफत उपचार करण्याची चौधरी कुटुंबाची ७७ वर्षांची परंपरा आजही सुरू आहे. या सेवाभावी कार्याची सुरुवात स्व. नामदेवराव चौधरी यांनी केली होती. त्यांचा हा समाजोपयोगी वारसा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. अवधूत चौधरी यांनी पुढे सुरू ठेवला आहे.

डॉ. अवधूत चौधरी यांना खेळाची विशेष आवड असून, कबड्डी, कुस्ती तसेच क्रिकेटमधील खेळाडूंवरही ते अनेकदा मोफत उपचार करतात. दहीहंडीच्या उत्सवात गोविंदा जखमी झाल्यास त्यांच्या उपचारासाठी ते तत्परतेने पुढे येतात.

डॉ. अवधूत चौधरी हे सातपुड्याच्या जंगलातून विविध प्रकारच्या वनौषधी आणून त्यापासून लेप तयार करतात. जखमी रुग्णांवर या वनौषधींच्या माध्यमातून उपचार करण्याचे कार्य ते करीत आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांचे बंधू संजय चौधरी तसेच त्यांची पुढील पिढी डॉ. नितेश चौधरी आणि डॉ. स्वप्निल चौधरी यांचा मोलाचा सहभाग आहे.

जळगाव शहर व तालुक्यातील दहीहंडी उत्सवात गोविंदा जखमी झाल्यास त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येतील, असे आवाहन डॉ. अवधूत चौधरी यांनी केले आहे. तीन पिढ्यांपासून सुरू असलेली ही सेवा आजही कायम असल्याने चौधरी कुटुंबाच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *