भुसावळच्या राजकारणात मोठी उलथापालथ!
प्रहारच्या अनिलभाऊ चौधरींसह नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.
मुंबई : भुसावळच्या राजकारणात आज मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुंबईतील नंदवन येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे आणि निखिल संतोषभाऊ चौधरी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. भुसावळ आणि जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय ताकद उभी करणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करणे, हा या राजकीय निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रवेशावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबरावजी पाटील, पाचोरा आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार बच्चूभाऊ कडू, चोपडा आमदार चंद्रकांतअण्णा सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांतभाऊ पाटील, पारोळा आमदार अमोल चिमणआबा पाटील, उपनेत्या सौ. सरिता माळी कोल्हे तसेच जळगाव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे नमूद करण्यात आले.
अनिलभाऊ चौधरी आणि नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भुसावळमध्ये शिवसेनेला संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी काळात या प्रवेशाचा स्थानिक राजकारणावर नेमका काय परिणाम होतो आणि कोणती नवी राजकीय समीकरणे आकाराला येतात, याकडे आता जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
धाडस महाराष्ट्र न्यूज
