बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळ

२६ ऑगस्टला भव्य कार्यक्रम; सहकार क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

जळगाव | प्रतिनिधी : सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या नवीन वास्तूत स्थलांतर सोहळा बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. जळगाव शहरातील प्रतापनगर परिसरात, ढाके कॉलनी–गणेश कॉलनी रोडवरील राजर्षी शाहू कॉम्प्लेक्ससमोरील ‘बुलडाणा अर्बन भवन’ येथे हा सोहळा होणार आहे.

या कार्यक्रमास बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक (भाईजी), बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर तसेच पाचोरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषजी तोतला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

स्थलांतर सोहळ्यानंतर कानळदा रोडवरील के.सी. पार्कसमोरील समर्थ लॉन्स येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित मान्यवर, सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात ३२ शाखांचे जाळे

बुलडाणा अर्बनने जळगाव जिल्ह्यात आपल्या सेवा मोठ्या प्रमाणावर विस्तारल्या असून जिल्ह्यात संस्थेच्या ३२ शाखा कार्यरत असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. जळगाव, भुसावळ, वरणगाव, रावेर, फत्तेपूर, जामनेर, पाचोरा, नगरदेवळा, चोपडा, गोलाणी मार्केट, चाळीसगाव आणि धरणगाव यांसह विविध भागांमध्ये संस्थेची शाखा कार्यालये कार्यरत आहेत.

संस्थेच्या विस्तारामध्ये स्वमालकीच्या शाखा कार्यालयांबरोबरच शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी गोदाम आणि शीतगृह सुविधांनाही महत्त्व देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात संस्थेची ७ स्वमालकीची गोदामे असून त्यांची एकत्रित क्षमता सुमारे ४ लाख ५० हजार पोती इतकी आहे. तसेच जळगाव व भुसावळ येथे २ स्वमालकीची शीतगृहे असून त्यांची एकत्रित क्षमता सुमारे १ लाख ५० हजार पोती असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

५११ कोटींच्या ठेवी; ४५८ कोटींचे कर्जवाटप

जळगाव जिल्ह्यात बुलडाणा अर्बनच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांना मोठी चालना मिळत असल्याचे संस्थेने सांगितले आहे. जिल्ह्यात संस्थेच्या एकूण ५११ कोटी रुपयांच्या ठेवी असून सुमारे ४५८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे.

यामध्ये तब्बल ३२१ कोटी रुपयांचे सोनेतारण कर्ज आणि सुमारे ३५ कोटी रुपयांचे वेअरहाऊस तारण कर्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. वेअरहाऊसच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना धान्य तसेच कृषीमाल सुरक्षितपणे साठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

४८२ शाखा आणि ४६२ गोदामांचे व्यापक जाळे

बुलडाणा अर्बनच्या संस्थात्मक विस्ताराचा विचार केला तर संस्थेच्या एकूण ४८२ शाखा आणि ४६२ गोदामे कार्यरत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.

संस्थेच्या एकूण ठेवी १६,१७७ कोटी रुपये, तर एकूण कर्ज वितरण ११,७९५ कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. संस्थेची सभासद संख्या १६ लाख ५ हजार ८४१ इतकी असून सोनेतारण कर्जाचे प्रमाण ५,६७२ कोटी रुपये आणि वेअरहाऊस तारण कर्जाचे प्रमाण ४४० कोटी रुपये असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

आर्थिक सेवांसोबत सामाजिक बांधिलकी

बुलडाणा अर्बनकडून केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

तिरुपती बालाजी, माहूरगड, शिर्डी, तुळजापूर, अयोध्या आणि पंढरपूर यांसारख्या धार्मिक स्थळांवर भक्तनिवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिरात सीबीएसई पॅटर्न निवासी शाळेसह विविध ठिकाणी संस्थेच्या २६ इंग्रजी माध्यमाच्या शाळा कार्यरत असून सुमारे ३० हजार विद्यार्थी या शैक्षणिक व्यवस्थेत शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.

सभासदांच्या पाल्यांसाठी पुणे आणि बुलडाणा येथे वसतिगृह सुविधा, बुलडाणा व मोर्शी येथे गो-रक्षण धाम, बुलडाणा येथे वेद विद्यालय, महामार्गांवर रुग्णवाहिका सेवा तसेच स्वर्गरथ सेवा अशा विविध सामाजिक उपक्रमांचाही संस्थेच्या कार्यात समावेश आहे.

याशिवाय मलकापूर ते चिखली महामार्गाचे बीओटी तत्त्वावर बांधकाम करण्यात आल्याचेही संस्थेकडून नमूद करण्यात आले आहे.

शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी विविध कर्ज सुविधा

बुलडाणा अर्बनच्या शाखांमधून सभासद आणि ग्राहकांना विविध आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये सोनेतारण कर्ज, वेअरहाऊस पावती तारण कर्ज, एलआयसी तारण कर्ज आणि लॉकर सुविधा यांचा समावेश आहे.

विशेषतः वेअरहाऊस सुविधेमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना धान्य तसेच विविध कृषीमाल सुरक्षितपणे साठवून त्याचा योग्य वेळी आर्थिक उपयोग करून घेता येत असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

‘सामाजिक बांधिलकी’चा संदेश

जळगाव खान्देश शाखेचे स्वमालकीच्या वास्तूत होणारे स्थलांतर हे संस्थेच्या जळगाव जिल्ह्यातील विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आर्थिक सेवा, शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी कर्ज सुविधा, गोदाम व शीतगृह व्यवस्था तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून बुलडाणा अर्बनने आपले कार्यक्षेत्र विस्तारले असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

“केवळ अर्थ व्यवहारच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीसुद्धा” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्थलांतर सोहळ्यास नागरिक, सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बुलडाणा अर्बन परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *