“महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा! २३ दिवसांत ४ बळी; जळगावकरांच्या जीवाची किंमत कोण ठरवणार?”

महामार्ग अजून किती बळी घेणार?

बायपास बंद झाल्यानंतर अवघ्या २३ दिवसांत चार बळी; जळगावकरांच्या जीवाची किंमत कोण ठरवणार?

जळगाव : पाळधी–तरसोद बायपास बंद झाल्यानंतर जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बायपास बंद असल्याने अवजड वाहनांचा मोठा भार शहरातील मुख्य महामार्गावर आला असून, वाहतुकीत जवळपास ८० टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा करण्यात येत आहे. वाढलेली वाहतूक, रस्त्यावरील खड्डे, खचलेल्या साईडपट्ट्या, धोकादायक उंचवटे आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे हा महामार्ग नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे, बायपास बंद झाल्यानंतर अवघ्या २३ दिवसांत चार नागरिकांचा अपघाती मृत्यू झाल्याने महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

चार मृत्यूंनी उपस्थित केला गंभीर प्रश्न

५ ऑगस्ट रोजी हॉटेल दरबार ते सीएनजी गॅस पंप परिसरात भरधाव टँकरने धडक दिल्याने मंगला अर्जुन माळी (५५, रा. ज्ञानदेव नगर) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांचा मुलगा भरत माळी गंभीर जखमी झाला.

यानंतर कालिंका माता मंदिर परिसरात अपघातग्रस्त झालेले प्रेमराज शिवराम चौधरी (७५) यांचा उपचारादरम्यान २० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.

त्याच दिवशी बांभोरी पुलाजवळ योगेश कडू महाजन (३८) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.

तर प्रभात चौक उड्डाणपूल परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अनिरुद्ध सुरेश डहाके (५८, रा. श्रद्धा कॉलनी) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे चार मृत्यू केवळ सरकारी आकडेवारीतील संख्या नाहीत. या चार घटनांमुळे चार कुटुंबांनी आपली माणसे गमावली आहेत. त्यामुळे “महामार्ग अजून किती बळी घेणार?” हा प्रश्न आता जळगावकरांच्या मनात निर्माण झाला आहे.

वर्षभरातील अपघातांचाही गंभीर मुद्दा

जळगाव शहर व परिसरातील महामार्गावर वर्षभरात सुमारे ७० नागरिकांचा अपघाती मृत्यू झाल्याची गंभीर परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. अशा पार्श्वभूमीवर बायपास बंद झाल्यानंतर अवघ्या २३ दिवसांत आणखी चार बळी जाणे ही संबंधित यंत्रणांसाठी गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे.

बायपास बंद होण्याचा निर्णय आणि त्यानंतर शहरातून वाढणाऱ्या अवजड वाहतुकीचा अंदाज घेऊन महामार्गावरील सुरक्षाव्यवस्था आधीच मजबूत करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डे, खचलेल्या साईडपट्ट्या, धोकादायक उंचवटे आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

अपघातानंतर पंचनामा नव्हे, अपघात रोखणे गरजेचे

अपघात झाल्यानंतर पंचनामा करणे किंवा मृतांच्या कुटुंबीयांना सांत्वन देणे ही अपघात रोखण्याची उपाययोजना नाही. अपघात होऊच नयेत, यासाठी रस्ता सुरक्षित ठेवणे ही संबंधित यंत्रणांची खरी जबाबदारी आहे, अशी भूमिका नगरसेवक अरविंद देशमुख यांनी मांडली आहे.

त्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जळगाव शहरातून जाणाऱ्या संपूर्ण महामार्गाचे तातडीने Road Safety Audit करण्याची मागणी केली आहे.

तसेच खड्डे आणि साईडपट्ट्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करणे, ब्लॅक स्पॉटवर रिफ्लेक्टर, रम्बल स्ट्रिप्स, बॅरिकेड्स, स्पीड लिमिट बोर्ड तसेच पुरेशी प्रकाशव्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बायपासवरील पुलाच्या भरावाची चौकशी करण्याची मागणी

पाळधी–तरसोद बायपासवरील पुलाचा भराव अल्पावधीत खचण्यामागील कारणांची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी अधिकारी अथवा कंत्राटदार आढळल्यास त्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली आहे.

आकाशवाणी, इच्छादेवी आणि अजिंठा चौकांचा प्रश्न कधी सुटणार?

शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौक या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपूल किंवा अंडरपासच्या डीपीआरची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील मंजुरीसाठी पाठवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बायपास बंद आणि समांतर रस्त्याचे काम; नियोजनावरही प्रश्नचिन्ह

दरम्यान, बायपास बंद असतानाच शहरातील समांतर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीच्या नियोजनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

समांतर रस्त्याचे काम विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे, याबाबत कोणताही विरोध नाही. मात्र, बायपास बंद असताना आणि शहरातून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना याच काळात समांतर रस्त्याचे काम सुरू करणे कितपत योग्य होते? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

कामामुळे काही ठिकाणी खालून जाणारी वाहतूक उड्डाणपुलावरून वळवावी लागत असल्याने आधीच वाढलेल्या वाहतुकीचा अतिरिक्त भार मुख्य महामार्ग आणि उड्डाणपुलांवर पडत असल्याचे चित्र आहे.

विकासकामांचा विरोध नाही; मात्र विकासकामांसोबत वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांची सुरक्षा यांचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. एका बाजूला बायपास बंद, दुसऱ्या बाजूला समांतर रस्त्याचे काम आणि मध्ये जीव मुठीत धरून प्रवास करणारा जळगावकर, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका करण्यात येत आहे.

“पाचव्या बळीची वाट पाहू नका!”

बायपास बंद झाल्यानंतर झालेल्या चार मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आता संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

रस्त्याची दुरुस्ती, वाहतूक नियमन, प्रकाशव्यवस्था, ब्लॅक स्पॉटवरील सुरक्षाव्यवस्था आणि पर्यायी वाहतूक मार्गांचे नियोजन याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

चार बळी गेले आहेत. आता पाचव्या बळीची वाट पाहू नका. जळगावकरांच्या जीवाची किंमत ठरवण्याची वेळ आली आहे.

महामार्ग अजून किती बळी घेणार?

अरविंद देशमुख नगरसेवक, प्रभाग क्रमांक १५जळगाव महानगरपालिका

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *