जळगाव | प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेच्या कचरा डेपो परिसरातील मनपाच्या मालकीचा वजन काटा अखेर कार्यान्वित करण्यात आला असून, उपमहापौर मनोज चौधरी यांनी महासभेत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेल्या या वजन काट्यामुळे मनपाला आर्थिक फटका बसत असल्याचा मुद्दा त्यांनी वारंवार उपस्थित केला होता.
मनपाच्या मालकीचा वजन काटा उपलब्ध असतानाही केवळ किरकोळ दुरुस्तीअभावी तो वापरात आणला जात नव्हता. परिणामी, कचऱ्याचे वजन करण्यासाठी खाजगी वजन काट्यांचा वापर करण्यात येत होता. यावरून उपमहापौर मनोज चौधरी यांनी महासभेत तीव्र नाराजी व्यक्त करत मनपाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचा आरोप केला होता. तसेच जळगावकरांच्या कराच्या पैशांचा अनावश्यक खर्च होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.
उपमहापौरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने अखेर कचरा डेपोवरील वजन काट्याची दुरुस्ती करून तो सुरू केला आहे. यामुळे कचऱ्याचे वजन अधिक अचूकपणे नोंदवले जाणार असून, वजन प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
याशिवाय, वजन काट्यावरील कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण उपमहापौरांच्या दालनातील स्क्रीनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे वजन प्रक्रियेवर सतत नजर ठेवणे शक्य होणार असून, कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेवर त्वरित कारवाई करता येणार आहे.
दरम्यान, कचरा डेपोप्रमाणेच शहरातील टीबी हाऊस परिसरातील बंद अवस्थेतील दुसरा वजन काटाही तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याच्या सूचना उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या दोन्ही वजन काट्यांच्या कार्यान्वयनामुळे मनपाच्या महसुलातील गळती रोखण्यास मदत होणार असून, आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
